भारतीय संघाने रविवारी (20 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकला. मालिकेतील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. अशात दुसऱ्या सामन्याचे महत्व अधिकच वाढले. माऊंट माँगनुई याठिकाणी खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने तब्बल 65 धावांचा मोठा विजय मिळवला. हार्दिक पंड्या या मालिकेत संघाचे नेतृत्व करत असून सामना जिंकल्यानंतर त्याने खास प्रतिक्रिया देखील दिली.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या वादळी खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी केली. मार्यादित 20 षटकांमध्ये भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ अवघ्या 126 धावा करून बाद झाला. भारतासाठी सूर्यकुमारने अवघ्या 51 चेंडूत नाबाद 111 धावा कुटल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 11 चौकार, तर 7 षटकार निघाले. या जबरदस्त प्रदर्शनासाठी सूर्यकुमारला सामनावीर म्हणून निवडले देखील गेले. दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियन्सन याने त्याच्या संघासाठी सर्वात जास्त 61 धावांची खेळी केली.
हार्दिक काय म्हणाला –
विजयानंतर माध्यमांशी बोलताना हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “यापेक्षा चांगले काही होऊ शकत नाही. सूर्यकुमार यादवची ही नक्कीच एक महत्वाची खेळी होती. आम्ही 170 ते 175 धावसंख्या उभी केली असती. गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. हे मानसिकता बदलल्यासारखे दिसत होते. तुम्ही प्रत्येक चेंडूवर विकेट घेऊ शकत नाही, पण आक्रमक गोलंदाजी नक्कीच करू शकता.”
हार्दिक पुढे बोलताना असेही म्हणाला की, “परिस्थिती ओलसर होती. यासाठी गोलंदाजांना श्रेय जाते. मी खूप गोलंदाजी केली आणि पुढे जाऊन संघासाठी गोलंदाजीचे अजून पर्याय पाहू इच्छितो. हे नेहमीच कामी येत नसते. मला वाटते फलंदाजांनी भविष्यात गोलंदाजी विभागात मदत केली पाहिजे. मला संघातील सर्वांना संधी द्यायची आहे, पण अजून फक्त एक सामना राहिला आहे. त्यामुळे हे थोडे कठीण आहे. मी या संघात अनेकदा पाहतो सर्व खेळाडू एकमेकांना मिळणाऱ्या यशामुळे आनंदी आहेत आणि हे खूप महत्वाचे आहे.”
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या टी-20 मालिकेत भारत शद्या 1-0 अशा आघाडीवर आहे. अशात मालिका बरोरीवर सोडण्यासाठी पुढचा सामना न्यूझीलंडला जिंकावा लागेल. टी-20 मालिकेतील पुढचा म्हणजेच तिसरा सामना मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. (Hardik Pandya’s Statament After victory against New Zealand in 2nd t20i)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॅटिंगला उतरण्याआधी ईशान किशनने केला मोठा घोळ, पंतला मैदानाबाहेर पाहावी लागली वाट
विराटपेक्षा सूर्याच भारी! विश्वास बसत नसेल, तर ‘ही’ आकडेवारी पाहाच