भारतीय संघाचा सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या वादळी फलंदाजीने सर्वांना आपले चाहते बनवले आहे. काल झालेल्या (६ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या टी२० सामन्यात त्याने अवघ्या २२ चेंडूंत ४२ धावांची धडाकेबाज खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पंड्याच्या या खेळीनंतर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉ याने म्हटले आहे की, एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर आता हार्दिक पंड्या ‘ग्लोबल स्टार’ बनू शकतो. पुढील तीन वर्षांत आयसीसीच्या दोन मोठ्या स्पर्धा भारतात होणार असून, हार्दिक त्यामध्ये काहीतरी जबरदस्त कामगिरी करेल, असेही वॉने म्हटले.
हार्दिक बनेल भारताचा ग्लोबल स्टार
इंग्लंडचा माजी कर्णधार राहिलेल्या मायकल वॉने एका मुलाखतीत म्हटले, ‘पुढील टी२० विश्वचषक भारतात होणार आहे. त्याआधी आयपीएलदेखील खेळवली जाईल. २०२३ मधील वनडे विश्वचषक देखील भारतात आहे. हार्दिककडे क्षमता आहे की तो, भारतीय संघाचा पुढचा जागतिक सितारा (ग्लोबल स्टार) बनू शकेल. भारताचा सर्वात उत्कृष्ट कर्णधार राहिलेला धोनी बराच काळ ग्लोबल स्टार होता. याक्षणी, विराट त्या जागी आहे. मला वाटते हार्दिक पुढील तीन वर्षात नक्कीच ग्लोबल स्टार बनू शकेल.’
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे हार्दिक
आयपीएलपासून हार्दिक पंड्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याने वनडे मालिकेत ९०, २८ आणि नाबाद ९२ अशा खेळ्या केल्या होत्या. टी२० मालिकेत त्याने १६ आणि नाबाद ४२ अशा खेळ्या खेळल्या आहेत. दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात १४ धावा हव्या होत्या, तेव्हा हार्दिकने २ उत्तुंग षटकार ठोकत, भारताला विजय मिळवून दिला.
लॉकडाऊनमध्ये केली मेहनत
आपल्या शानदार फार्मचे रहस्य हार्दिकने सामन्यानंतर (६ डिसेंबर) सांगितले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “लॉकडाऊनवेळी मी याच गोष्टीवर काम केले होते की, मी सामना कसा संपवू शकतो. माझ्यासाठी हे महत्त्वाचे नाही की, मी किती धावा बनवल्या आहेत. यापूर्वी, मी अशा परिस्थितीत खेळलो आहे. माझ्या मागील चुकांमधून शिकण्याचा माझा प्रयत्न असतो.”
हार्दिकने आयपीएलपासून आपला जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना त्याने काही लक्षवेधी खेळी केल्या होत्या. यापाठोपाठ, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो दोन वेळा सामनावीर ठरला आहे. अष्टपैलू असलेला हार्दिक सध्या पाठीच्या दुखापतीमुळे नियमितपणे गोलंदाजी करत नाही. आगामी टी२० विश्वचषकापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी भारतीय संघाला आशा आहे.
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग