भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या डावात 150 धावा केल्यानंतर भारतानं 46 धावांची आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. बुमराहनं त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 11वा फाईव्ह विकेट हॉल घेतला. तर नवोदित हर्षित राणानं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन बळी घेतले.
शनिवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 51.2 षटकांत 104 धावांवरच आटोपला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या शेवटच्या विकेटसाठी भारतीय संघाला थोडा संघर्ष करावा लागला. या दरम्यान स्टार्क आणि भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांच्यात एक मजेशीर घटना घडली. स्टार्कनं फलंदाजीदरम्यान हर्षितला गंमतीनं ‘धमकी’ दिली, ज्याचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. स्टार्क आणि हर्षित आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून एकत्र खेळले आहेत.
भारतानं पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ॲलेक्स कॅरी (21) आणि नॅथन लायन हेही लवकर बाद झाले. आता ऑस्ट्रेलियन संघ 100 धावांच्या आतच ऑलआऊट होईल असं वाटत होतं. मात्र स्टार्क खेळपट्टीवर ठाम उभा राहिला. 30व्या षटकात जेव्हा हर्षित राणा गोलंदाजी करायला आला तेव्हा त्यानं स्टार्कला बाउन्सर टाकला. हा बाउन्सर स्टार्कच्या ग्लोव्हजला लागला. यानंतर स्टार्क हसला आणि म्हणाला, “मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी करतो. माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे.” खरं तर, स्टार्कनं हर्षितला इशारा दिला की त्याला देखील अशाच बाउंसरचा सामना करावा लागू शकतो.
स्टार्कच्या कमेंटनंतर हर्षितही हसताना दिसला. स्टार्कच्या या मजेशीर कमेंटवर क्रिकेट चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं म्हटलं की, “हर्षितची प्रतिक्रिया खूपच मस्त आहे.” “या कमेंटनंतर हर्षित आणखी वेगानं गोलंदाजी करतोय”, असं दुसरा युजर म्हणाला.
Mitch Starc offers a little warning to Harshit Rana 😆#AUSvIND pic.twitter.com/KoFFsdNbV2
— cricket.com.au (@cricketcomau) November 23, 2024
स्टार्कनं भारतीय गोलंदाजांना बराच काळ त्रास दिला तरीही तो शेवटी हर्षितच्याच जाळ्यात अडकला. त्यानं हर्षितच्या चेंडूवर मिडऑनवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅकवर्ड पॉइंटवर यष्टिरक्षक रिषभ पंतनं त्याचा झेल घेतला. स्टार्कनं 112 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानं दोन चौकार मारले. पहिल्या डावात तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. जोश हेझलवूड 7 धावा करून नाबाद राहिला.
हेही वाचा –
IND vs AUS: यशस्वी जयस्वालने इतिहास रचला, हेड कोच गंभीरचा 16 वर्षे जुना विक्रम मोडला
तिलक वर्माचा भीमपराक्रम! टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू
IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडला, 1981 नंतर टीम इंडियाने कांगारूंना दाखवले वाईट दिवस