२९ मार्चपासून आयपीएलचा १३वा हंगाम सुरु होत आहे. या हंगामात गेल्यावर्षीपेक्षा बक्षिसांची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. असे असले तरीही आयपीएलचे मुल्य मात्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
सप्टेंबर २०१९च्या आकडेवारीनुसार हे मुल्य ६.८ बिलीयन डाॅलर अर्थात ४७,५०० कोटी रुपये होते. याचा जर जगातील जीडीपी क्रमवारीतील पहिल्या १८९ देशांचा विचार केला तर ४३ देशांपेक्षा जास्त आहे.
डफ आणि फेल्प्सच्या सप्टेंबर २०१९मधील रिपोर्टनुसार आयपीएलचे २०१४मध्ये मुल्य हे ३.२ बिलीयन डाॅलर होते. तर हेच मुल्य आता ६.८ बिलीयन डाॅलरवर आले आहे.
बीसीसीआय ही जगातील श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. विशेष म्हणजे आयसीसीला सर्वाधिक उत्पन्न हे बीसीसीआयच्या माध्यमातून मिळते. याच बीसीसीआयकडे हक्काची अशी ही आयपीएल लीग स्पर्धा आहे.
जगात सध्या अनेक लीग स्पर्धा खेळवल्या जातात. त्यात बीग बॅश, पीसीएल, बांगलादेश प्रीमीयर लीग, कॅनडा टी२०, दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट लीग, कॅरेबियन प्रीमीयर लीग अशा लीग होतात.
परंतु जगातील अनेक खेळाडू हे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाचीच किंमत ८०९ कोटींच्या पुढे आहे. तर सर्वात कमी किंमत राजस्थान राॅयल्सची असून ती २७१ कोटी आहे.
असे वाढले आयपीएलचे मुल्य-
३.२ बिलीयन डाॅलर- २०१४
३.५ बिलीयन डाॅलर- २०१५
४.२ बिलीयन डाॅलर- २०१६
५.३ बिलीयन डाॅलर- २०१७
६.३ बिलीयन डाॅलर- २०१८
६.८ बिलीयन डाॅलर- २०१९






