---Advertisement---

ज्याच्यावर होता गर्व आता तोच ठरतोयं गंभीर-सूर्याच्या चिंतेचे कारण! फायनलमध्ये टीम इंडियाचा खेळ खराब…

On: शनिवार, मार्च 7, 2026 4:38 PM
---Advertisement---

भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध २५३ धावा केल्या. ही धावसंख्या टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील बाद फेरीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. टी२० प्रकारामध्ये अनेकदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचा प्रयत्न २०० धावा करण्याचा असतो. तसेच भारताने केले, मात्र गतविजेत्याला इंग्लंडविरुद्धचा सामना केवळ ७ धावांनी जिंकता आला. भारताचा हा विजय काही खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षण केल्याने मिळाला.

यावरून भारतीय गोलंदाजांचा इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतलेला दिसला. जसप्रीत बुमराहची गोलंदाजी वगळता बाकींनी निराशा केली. त्यातल्या त्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्ती तर चांगलाच महाग ठरला. तो आयसीसी टी२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना तो संघाची चिंता वाढवत आहे.

इंग्लंडविरुद्ध वरुणने ४ षटकात ६४ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्याची ही कामगिरी अंतिम सामन्यात भारताच्या पराभवाचे मोठे कारण बनू शकते. कारण न्यूझीलंडचे सलामीवीर फिन ऍलन आणि टीम सेफर्ट हे सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. ऍलनने तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ३३ चेंडूत शतकी खेळी करत विश्वविक्रम केला.

ऍलन-सेफर्ट ही जोडी आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम जोडी ठरली आहे. त्यांनी आतापर्यंत सलामीला येताना ४६३ धावा केल्या आहेत. हा नवा विक्रम झाला असून २०२४चा विक्रम मोडला गेला. अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरान आणि रहमनुल्लाह गुरबाज यांनी २०२४च्या टी२० विश्वचषकात ४४६ धावा केल्या होत्या.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याने स्पिनर्ससाठी कर्दणकाळ ठरली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना ज्या खेळपट्टीवर खेळला जाणार ती काळ्या-लाल मातीची आहे. तेथे धावसंख्या २०० होण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर सध्याच्या स्पर्धेतील एकच सामना खेळला गेला. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कॅनडाला ५३ धावांनी पराभूत केले होते.

भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर अधिक धावा दिल्या होत्या. त्यामुळे भारताच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. चक्रवर्तीबरोबर अक्षरनेही ३ षटकात ३५ धावा दिल्या होत्या. त्याचे क्षेत्ररक्षण उत्तम राहिले, मात्र वरुणचा फॉर्म भारतासाठी धोकादायक ठरत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अंतिम सामन्यात त्याच्याबाबत काय निर्णय घेतील याकडे लक्ष असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---