गोवा। सातव्या इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी बाद फेरीतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठीची चुरस आणखी वाढली. हैदराबाद एफसीने केरला ब्लास्टर्सवर 4-0 असा दणदणीत विजय मिळवित तिसरे स्थान गाठले. हैदराबादचे सर्व गोल दुसऱ्या सत्रात झाले.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. आघाडी फळीतील स्पेनच्या 36 वर्षीय फ्रान सँडाझा याने दुसऱ्या सत्रात पाच मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. यात पेनल्टीचाही समावेश होता. अखेरच्या पाच मिनिटांत आघाडी फळीतील स्पेनच्या 33 वर्षीय अरीडेन सँटाना आणि मध्य फळीतील ब्राझीलच्या 32 वर्षीय जोओ व्हिक्टर यांनी भर घातली.
हैदराबादने 18 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून नऊ बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 27 गुण झाले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि एफसी गोवा या संघांना मागे टाकून त्यांनी तिसरे स्थान गाठले, मात्र या दोन्ही संघांचा एक सामना बाकी आहे. नॉर्थईस्टचे 26, तर गोव्याचे 24 गुण आहेत.
या जोरदार विजयामुळे हैदराबादचा गोलफरक तब्बल 8 (25-17) इतका झाला आहे. नॉर्थईस्टपेक्षा त्यांचा एक गोल जास्त, तर गोव्यापेक्षा एकच कमी आहे. मुख्य म्हणजे या दोन्ही संघांना प्रत्येकी 21 गोल पत्करावे लागले आहेत, तर हैदराबादविरुद्ध 17 गोल झाले आहेत. ही बाब हैदराबादसाठी अऩुकूल ठरू शकते.
एटीके मोहन बागान (36 गुण) आणि मुंबई सिटी एफसी (34) या दोन संघांचाच बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला आहे. ब्लास्टर्सला 18 सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व सात बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण व शेवटून दुसरे म्हणजे दहावे स्थान कायम राहिले.
सामन्याच्या 58व्या मिनिटाला बचावपटू बकारी कोने याच्या खराब फटक्यामुळे हैदराबादचा स्ट्रायकर जोएल चायनेस याला चेंडूवर ताबा मिळविता आला. जोएलने प्रतिस्पर्धी बचावपटू कोस्टा न्हामोईनेस्कू याला दाद लागू न देता सँडाझाला पास दिला. सँडाझाने मग सहजतेने फिनिशींग केले.
हैदराबादचा दुसरा गोल कोनेच्याच ढिलाईमुळे झाला. नेटजवळ त्याने गोलरक्षक अल्बिनो गोम्स याला बॅकपास देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अचूकता नव्हती. त्यामुळे सँडाझाला संधी मिळाली. गोम्सने सँडाझाला पाडले. त्यामुळे रेफरी एल. अजित मैतेई यांनी हैदराबादला पेनल्टी बहाल केली. याशिवाय गोम्सला यलो कार्डही दाखविण्यात आले. पेनल्टीवर सँडाझाने आधी गोम्स हलण्याची वाट पाहिली. गोम्स डावीकडे हलताच त्याने थेट समोर फटका मारत गोल केला.
सामन्याच्या 86व्या मिनिटाला कोस्टा न्हामोईनेस्कू याने सँटानाला पाडले. त्यामुळे हैदराबादला फ्री किक देण्यात आली. बदली मध्यरक्षक लुईस सॅस्त्रे याने त्यावर गोलक्षेत्रात चेंडू मारला. सँटानाने उडी घेत ताकदवान हेडिंगवर गोल केला.
त्यानंतर अखेरच्या मिनिटाला लुईसनेच घेतलेल्या फ्री किकवर सँटानाने हेडिंगद्वारे चेंडू व्हिक्टरकडे मारला. व्हिक्टरने चपळाईने गोल केला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीला पराभवाचा धक्का देत बेंगळुरूने राखल्या बाद फेरीच्या आशा कायम
आयएसएल २०२०-२१ : जमशेदपूरला हरवून एटीके मोहन बागानची आघाडी
आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून नॉर्थईस्ट तिसऱ्या स्थानी