मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदाराबाद संघात सामना पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने २१ धावांनी जिंकला. दिल्लीच्या या विजयात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याचा मोठा वाटा होता. त्याने या सामन्यात अर्धशतक झळकावत सामनावीर पुरस्कार जिंकला. यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना काही मजेशीर भाष्यही केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सकडून वॉर्नरने (David Warner) ५८ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १२ चौकारांचा आणि ३ षटकारांचा समावेश होता. ही खेळी करताना त्याने रोवमन पॉवेलबरोबर चौथ्या विकेटसाठी नाबाद १२२ धावांची भागीदारी केली. पॉवेलने ६७ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीला २० षटकांअखेर ३ बाद २०७ धावा करता आल्या. त्यानंतर हैदराबादला २० षटकांत ८ बाद १८६ धावाच करण्यात यश मिळाले. वॉर्नरच्या या खेळीमुळे त्याचा सामनावीर पुरस्कार (Man of the Match) देऊन सन्मान करण्यात आला (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad).
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर वॉर्नर म्हणाला, ‘ही नक्कीच चांगली खेळपट्टी होती. मला माहित होते की, जर मी माझे फटके खेळले, तर धावा सहज होतील. मुंबईमध्ये आद्रता नक्कीच आव्हान देते आणि मला त्याचा त्रास होत होता. कारण मी आता वयस्कर होत चाललो आहे.’
पुढे वॉर्नर म्हणाला, ‘दुसऱ्या बाजूला रोवमन पॉवेल होता, जे खूप चांगले होते. विजय मिळवणे चांगले आहे. हैदराबाद विरुद्ध खेळण्यासाठी मला दुसऱ्या कोणत्या प्रेरणेची गरज नव्हती. भूतकाळात जे झाले ते सर्वांनी पाहिले आहे. पॉवेलबरोबर फलंदाजी करताना वेगाने पळणे माझ्यासाठी मुर्खपणा होता. तो चांगले फटके मारतो.’
गेल्यावर्षापर्यंत वॉर्नर हैदराबाद संघात खेळत होता. तसेच तो संघाचा कर्णधारही होता. पण गेल्यावर्षी त्याची सुरुवातीची कर्णधार म्हणून चांगली कामगिरी झाली नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून अर्ध्या हंगामातून काढण्यात आले होते. तसेच त्याला काही सामन्यांमध्ये अंतिम ११ जणांमध्येही स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर वॉर्नर आणि हैदाराबाद फ्रँचायझी यांच्यातील वादाची बरीच चर्चा झाली होती. अखेर आयपीएल २०२२ पूर्वी हैदराबादने वॉर्नरला मुक्त केले आणि लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात स्थान दिले. त्यामुळे वॉर्नर आता दिल्लीकडून खेळताना दिसत आहे.
दरम्यान, गुरुवारी वॉर्नरने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक चांगला स्विच हिटचा फटका मारत चौकार वसूल केला होता. याबद्दल वॉर्नर म्हणाला, ‘स्विच हिट मारला कारण मला वाटले भूवी यॉर्कर टाकेल, पण तो वाईडर होता. मी असा फटका खेळताना जोसला पाहिले होते. मी त्याचा नेटमध्ये सराव केला होता.’
वॉर्नर आयपीएलच्या १५ व्या हंगामात (IPL 2022) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांपैकी ४ सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. त्याने ८ सामन्यांत मिळून ५९.३३ च्या सरासरीने ३५६ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
Video: भुवनेश्वरने ऐनवेळी बदलली भूमिका, मग वॉर्नरनेही अफलातून शॉटने दाखवला आपला क्लास
बड्या दिलाचा वॉर्नर! स्वत:च्या शतकाची नाही केली पर्वा, संधी असूनही पॉवेलला म्हणाला, तोडूनफोडून टाक!
वॉर्नर आणि पॉवेलने चोपले, खलील अहमदने रोखले; दिल्लीचा हैदराबादवर २१ धावांनी विजय