ऑनलाइन बुद्धीबळ सामन्यात भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू आणि पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला हरवल्यानंतर भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश निखिल कामत सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला बळी पडत आहे. झेरोधाचा सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कामत याने एका कार्यक्रमात ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यानंतर, आता निखिलने सोशल मीडियावर यामागील सत्य सांगितले आणि आपण फसवून जिंकल्याचे कबूल केले.
कोविड रूग्णांसाठी उभारला जात होता निधी
कोविड -१९ मदत निधीसाठी १३ जून रोजी झालेल्या या सामन्यात आनंदने चेस डॉट कॉमच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेते आमिर खान व रितेश देशमुख, भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांच्यासह १० लोकप्रिय व्यक्तींसह बुद्धिबळ खेळले. ही एक चॅरिटी इव्हेंट होती, ज्याद्वारे देशातील कोविड रूग्णांसाठी निधी उभारला जात होता. मात्र, केवळ निखिलच आनंदला हरवू शकला. यानंतर सत्य बाहेर आले की, निखिलने जिंकण्यासाठी फसवणूक केली आहे.
निखिलने दिले स्पष्टीकरण
निखिल कामत याने विश्वनाथन आनंद याला पराभूत केल्यानंतर सोशल मीडियावर या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली. त्यावर निखिल याने एक पोस्ट करत, सर्व घटनेची सत्यता जगाला सांगितली. त्याने लिहिले, “मी खरेच आनंद यांना हरवले असे वाटत असेल तर तो वेडेपणा ठरेल. हे म्हणजे सकाळी झोपेतून उठा आणि उसेन बोल्टला १०० मीटर शर्यतीत हरवा असे झाले. त्यावेळी मला सल्ला देण्यासाठी अनेक लोक उपस्थित होते. तसेच मी संगणकाची देखील या कामी मदत घेतली. मला माहिती आहे हे बरोबर नाही. मात्र, चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी हे सर्व कबूल करत आहे.”
Yesterday was a celebrity simul for people to raise money It was a fun experience upholding the ethics of the game.I just played the position onthe board and expected the same from everyone . pic.twitter.com/ISJcguA8jQ
— Viswanathan Anand (@vishy64theking) June 14, 2021
आनंदने व्यक्त केली नाराजी
विश्वनाथन आनंद मात्र निखिल याच्या स्पष्टीकरणाविषयी समाधानी असल्याचे दिसले नाही. या ट्विटला उत्तर देताना ते म्हणाले, “लोकांकरिता निधी गोळा करण्यासाठी हे सेलिब्रिटी सिमुल होते. हा एक मजेदार अनुभव होता आणि खेळ पुढे नेण्याची संधी होती. मी स्वतः प्रामाणिकपणे खेळलो आणि उर्वरितकडूनही मी अशीच अपेक्षा ठेवत होतो.”
ऑल इंडिया बुद्धिबळ फाऊंडेशनच्या सचिवांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले. तसेच, असे घडायला नव्हते पाहिजे असे देखील सांगितले. यासोबतच निखिलच्या बुद्धिबळ विषयक प्रोफाइलवरही बंदी घालण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन म्हणतोय, कसोटी चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडचं पारडं जड; पण का? घ्या जाणून
‘बंदीपासून वाचण्यासाठी अश्विन क्रिकेटपासून दूर गेला,’ माजी पाकिस्तानी गोलंदाजाचा गंभीर आरोप
विंडिजविरुद्ध बरसले होते ऑस्ट्रेलियाचे जाबाज, एकाच डावात ५ शतकांसह चोपल्या होत्या ७५८ धावा