सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ टी२० मालिकेत व्यस्त आहे. टी२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ खेळवली जाईल. या मालिकेपूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात पहिला तीनदिवसीय सराव सामना रविवारपासून (६ डिसेंबर) सिडनीतील ओव्हल मैदानावर खेळवण्यात येईल. सामन्यासाठी आज (५ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया अ संघाची घोषणा करण्यात आली. वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याला या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. या सामन्यापूर्वी, पॅटिन्सनने भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे कौतुक केले.
सिडनीत खेळवला जाणार पहिला सराव सामना
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय संघ सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा टी२० सामना खेळत असताना, भारत ए व ऑस्ट्रेलिया ए यांच्या दरम्यान तीनदिवसीय सराव सामन्याला सिडनीतील ओव्हल मैदानावर सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी, ऑस्ट्रेलिया अ संघात निवड झालेल्या जेम्स पॅटिन्सनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाला मुलाखत दिली. आपल्या मुलाखतीत तो म्हणाला, “बुमराह फक्त टी२० नाहीतर, तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वात्कृष्ट गोलंदाज आहे. तो मला एक दर्जेदार खेळाडू वाटतो. बुमराह कायम क्रिकेटविषयी बोलत असतो. क्रिकेटबद्दल त्याची मानसिकता खूप सकारात्मक आहे. मी त्याच्यासोबत खेळून अधिक चांगला गोलंदाज होण्याचा प्रयत्न केला.”
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता पॅटिन्सन
मागील महिन्यात संपलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामामध्ये जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत होते. त्या अनुभवाविषयी सांगताना पॅटिन्सन म्हणाला, “मला वाटले होते त्यापेक्षा अधिक गोलंदाजी बुमराहने सरावादरम्यान केली होती. मी त्याची गोलंदाजी पाहून थक्क झालो. या दोन महिन्यांच्या काळात मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. यॉर्कर चेंडू टाकण्याचे कसब त्याच्याकडून मला शिकायला मिळाले.”
आयपीएल २०२० लिलावावेळी जेम्स पॅटिन्सनला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. मात्र, लसिथ मलिंगाने माघार घेतल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून जेम्स पॅटिन्सनला बोलावण्यात आले होते. पॅटिन्सनने बुमराह व ट्रेंट बोल्ट यांच्या साथीने मुंबईला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता
“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”
‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी
ट्रेंडिंग लेख-
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण