भारतीय संघाने शुक्रवारी (१७ जून) दक्षिण आफ्रिका संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभाची धूळ चारली. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा हा चौथा सामना होता. या विजयानंतर भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. या महत्वाच्या सामन्यात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने अर्धशतक ठोकले. कार्तिक सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता त्याला आगामी टी-२० विश्वचषकात संधी मिळणे अपेक्षित आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी देखील यासाठी दुजोरा दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा चौथा सामना जिंकण्यासाठी सर्वात महत्वाचे योगदान दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यानेच दिले. कार्तिकने अवघ्या २७ चेंडूत ५५ धावा चोपल्या. यामध्ये ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या जबरदस्त प्रदर्शनासाठी कार्तिकला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला. कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी असली, तरी टी-२० क्रिकेटमधील ते त्याने भारतीय संघासाठी केलेले पहिले अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी त्याला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक करता आले नव्हते.
भारतीय संघाची धावसंख्या ४० असताना त्यांनी ३ महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. अशात संघाला जेव्हा एका मोठ्या भागीदारीची गरज होती, तेव्हा हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकने ही गरज पूर्ण केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३३ चेंडूत ६५ धावांची भागीदारी केली. हार्दिकने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६९ धावा केल्या.
भारताचा डाव संपल्यानंतर भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) कार्तिकच्या प्रदर्शानमुळे प्रभावित झाल्याचे पाहिले गेले. चालू वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. गावसकरांच्या मते कार्तिकला विश्वचषकासाठी नक्कीच संधी दिली गेली पाहिजे. ते म्हणाले की, “कार्तिकने कमाल फलंदाजी केली. जर कार्तिक विश्वचषकासाठी मेलबर्नला जाणाऱ्या विमानात सहभागी नसेल, मला खूप आश्चर्य वाटेल.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल होती. भारताचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने ४ षटकात १८ धावा खर्च केल्या आणि ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तसेच, युझवेंद्र चहलनेही २ विकेट्सचे योगदान दिले. आफ्रिकी संघ अवघ्या ८७ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने ८२ धावांनी विजय मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला जबाबदार कोण? केशव महाराजने ‘यांच्या’वर फोडलं अपयशाचं खापर
भारताच्या ‘या’ दोन पठ्ठ्यांनी आफ्रिकेला घाम फोडलाय! चौथ्या सामन्यात केलं धमाकेदार प्रदर्शन