भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ असल्याने मालिका चुरशीची होऊ शकते. या मालिकेविषयी अनेक दिग्गजांची मते आता पुढे येऊ लागली आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनीदेखील या ‘हाय वोल्टेज’ मालिकेपूर्वी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याची स्तुती केली. मला रहाणेचे आक्रमक नेतृत्व खूप आवडते, असे चॅपेल यांनी म्हटले आहे
चॅपेल यांनी रहाणेचे केले कौतुक
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार असलेल्या इयान चॅपेल यांनी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष रे यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मला अजिंक्य रहाणे एक उत्तम कर्णधार वाटतो. त्याचे नेतृत्व अत्यंत आक्रमक असते. मी त्याला धर्मशाला येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत नेतृत्व करताना पाहिले होते. मला आठवतेय, त्या कसोटीत वॉर्नर अत्यंत निग्रहाने फलंदाजी करत होता. मात्र, रहाणेने गोलंदाजीत बदल करताना, कुलदीप यादवला गोलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्याने वॉर्नरला बाद केले. फलंदाजीला आल्यावरही धावांचा पाठलाग करताना त्याने, काही आक्रमक खेळत सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. काही कर्णधार शांततेत नेतृत्व करत असतात, तर काही आक्रमक नेतृत्व करत असतात. मला अजिंक्य आक्रमक कर्णधार वाटतो.”
विराटने घेतली आहे पालकत्व रजा
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली ऍडलेड येथील पहिल्या दिवस-रात्र कसोटीनंतर भारतात परतणार आहे. त्याला आपल्या पहिल्या बाळाचा जन्मावेळी आपली पत्नी अनुष्कासोबत राहायचे असल्याने, त्याने बीसीसीआयकडे पालकत्व रजा मागितली होती. ही रजा मंजूर झाल्याने, तो भारतात परतेल. त्यानंतर उर्वरित तीन सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करताना दिसेल.
पहिल्या सामन्यात भारताचे पारडे जड
चॅपेल यांनी आगामी मालिकेत संदर्भात बोलताना म्हटले, “मला वाटते अजूनही ऑस्ट्रेलिया संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, पहिल्या कसोटीत डेविड वॉर्नर उपलब्ध नसल्यास, भारत या सामन्यात विजय मिळवू शकतो. ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी काहीशी अनुनभवी आहे. याचा फायदा भारतीय गोलंदाज उचलतील. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा देखील पहिल्या सामन्यात खेळणार नसल्यास, त्याजागी जेम्स पॅटिन्सन ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा भार वाहील. माझ्या मते, पहिल्या सराव सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या कॅमेरून ग्रीनचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश होऊ शकतो.”
ऑस्ट्रेलियाला भेडसावतेय सलामीवीराची समस्या
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर वनडे मालिकेत जखमी झाल्यामुळे, टी२० मालिकेला मुकला होता. त्यानंतर आता तो पहिल्या कसोटीतूनही बाहेर झाला आहे. संघातील राखीव सलामीवीर विल पुकोवस्कीला सराव सामन्यादरम्यान हेल्मेटवर चेंडू लागल्याने कन्कशनचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याचे देखील या सामन्यात खेळणे संदिग्ध आहे. अशा परिस्थितीत, ज्यो बर्न्ससह मार्कस हॅरिस सलामीला उतरू शकतो.
संबंधित बातम्या:
– पंतला कसोटी संघात स्थान मिळणे अवघड; या माजी खेळाडूने वर्तविली शक्यता
– भारताविरुद्ध या खेळाडूला उतरवा सलामीला, ऍलन बॉर्डर यांनी सुचवला तोडगा
– टीम इंडियासाठी आनंदाची गोष्ट; अजिंक्य रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या या संघाविरुद्ध शतकी खेळी