पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी 2025 पाकिस्तानमध्ये होणार असल्याची पुष्टी केली आहे. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही. टीम इंडिया जर स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात गेली नाही तर ही स्पर्धा दुसऱ्या देशात किंवा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याचीही शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार असल्याची माहिती पीसीबीचे नवे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्विटरवर दिली. त्यांनी लिहिलं की, “मी दुबईत आयसीसीच्या बैठकीत सहभागी झालो होतो. चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी 2025 मध्ये पाकिस्तानात होणार आहे.” पीसीबी अध्यक्षांच्या या विधानामुळे त्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला, ज्यात ही स्पर्धा इतरत्र आयोजित करावी लागेल, असं सांगितलं जात होतं.
मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानमधील आगामी कार्यक्रमांबाबत न्यूझीलंड क्रिकेट आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या अध्यक्षांशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. ही चर्चा चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच या देशांच्या नियोजित त्रिकोणी मालिकेसाठी महत्त्वाची आहे. मात्र, आयसीसीनं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितलंय की, आम्ही बीसीसीआयवर पाकिस्तानात जाण्यासाठी कोणताही दबाव आणणार नाही.
नियमांनुसार, आयसीसी आपल्या सदस्य देशांना त्यांच्या सरकारच्या निर्देशांविरुद्ध कोणत्याही देशात प्रवास करण्यास भाग पाडू शकत नाही. तथापि, बोर्डाच्या बैठकीत या विषयांवर चर्चा केली जाऊ शकते. जर एखाद्या देशाच्या सरकारनं आपली टीम दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर पाठवली नाही, तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल. अशा स्थितीत आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पाकिस्तानला नमतं घ्यावं लागणार हे स्पष्ट आहे.
टीम इंडिया शेवटची 2008 मध्ये पाकिस्तानला गेली होती. यानंतर भारतीय संघ अजून पाकिस्तानात गेलेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही देशांदरम्यान दीर्घकाळापासून एकही द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
एकदिवसीय आणि टी20 चे असे दिग्गज भारतीय फलंदाज जे कसोटीमध्ये फ्लॉप ठरले
लक्ष्य सेनचं स्वप्न भंगलं, ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव