बुधवारी(5 जून) 2019 विश्वचषकात पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने इंडियन पॅरा स्पेशल फोर्सचे बलिदान बॅज असलेले ग्लव्हज घातले होते. त्यामुळे त्याच्या या ग्लव्हजवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
आयसीसीने त्याला ग्लव्हजवरील हा बलिदान बॅज काढून टाकण्याची विनंती केली होती. परंतू बीसीसीआयने धोनीला पाठिंबा देत त्याच्या ग्लव्हजवरील बलिदान बॅज कायम ठेवू देण्यासाठी आयसीसीला विनंती केली होती. मात्र ही विनंती आयसीसीने फेटाळून लावली आहे.
बीसीसीआयच्या या विनंतीला नकार देताना आयसीसीने त्यांच्या विधानात म्हटले आहे की ‘आयसीसीने बीसीसीआयला उत्तर दिले आहे की मागील सामन्यात धोनीकडून यष्टीरक्षणाच्या ग्वव्हज ज्या लोगोचे(बलिदान बॅज) जे प्रदर्शन झाले त्याला आयसीसी 2019 विश्वचषकासाठी परवानगी देत नाही.’
‘आयसीसीच्या स्पर्धांच्या नियमांनुसार कोणत्याही साधनांवर आणि कपड्यांवर कोणताही वैयक्तिक संदेश किंवा लोगोचे प्रदर्शन करण्याची परवानगी नाही. तसेच हा लोगो(बलिदान बॅज) घालणे हे यष्टीरक्षकाच्या ग्वव्हजवरील काय असावे या नियमांचेही उल्लंघन करणारे आहे.’
आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक यष्टीरक्षकाच्या ग्लव्हजवर फक्त ग्लव्हज तयार करणाऱ्या कंपनीचे दोन लोगो लावण्याची परवानगी आहे.
आयसीसीने हा निर्णय देण्याआधी बीसीसीआय आणि धोनीने सांगितले होते की जर त्यांनी हे मानचिन्ह परीधान करणे चालू ठेवण्यासाठी योग्य कारण दिले तर आयसीसी यासाठी परवानगी देईल. पण याबाबतीत बीसीसीआय आयसीसीचे मन वळवण्यात अपयशी ठरल्याने धोनीला आता बलिदान बॅज असलेले ग्वव्हज घालता येणार नाही.
असे असले तरी धोनीला देशभरातून या प्रकरणाबद्दल पाठिंबा मिळत आहे. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही धोनीला पाठिंबा दिला आहे.
धोनीला 2011 मध्ये भारतीय संरंक्षण दलात लेफ्टनंट कर्नलची सन्माननीय पदवी देण्यात आली आहे. तसेच त्याने 2015मध्ये पॅरा ब्रिगेडच्या अंतर्गत प्रशिक्षणही घेतले आहे. त्यांनंतर त्याला पॅराशूट रेजिमेंटमध्ये सामिल केले गेले. त्यामुळे धोनीला हा बॅज घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
असे असले तरी आयसीसीने धोनीला त्यांच्या स्पर्धांमध्ये हा बॅज घालण्यासाठी नकार दिला असल्याने त्याला बलिदान बॅज असलेले ग्लव्हज या विश्वचषकात घालता येणार नाहीत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–युजवेंद्र चहल म्हणतो, गोलंदाजी करताना या खेळाची होते मदत
–ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची टीम इंडियाला चेतावणी
–या कारणामुळे डिविलियर्सला विश्वचषकासाठी संधी दिली नाही, दक्षिण आफ्रिका बोर्डाने केला मोठा खूलासा






