---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीचा टीम इंडियाला खास संदेश! गौतम गंभीरबाबत म्हणाला, “कोच साहेब…”

On: सोमवार, मार्च 9, 2026 11:47 AM
---Advertisement---

भारतीय संघाने रविवारी (८ मार्च) आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ जिंकला आणि संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण तयार झाले. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या ९६ धावांनी पराभव केला. या विजयानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने संघाचे अभिनंदन करत गौतम गंभीरला एक खास संदेशही दिला आहे. धोनीचा हा संदेश सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली होती. त्यामध्ये संजू सॅमसनने ८९ धावा केल्या आणि भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी टीम सेफर्ट वगळता बाकी न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक काळ टिकूच दिले नाही. हा सामना जिंकल्यावर धोनीने इंस्टाग्रामवर संघाचे अभिनंदन केल्याची पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये गंभीरबद्दल लिहिले जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

धोनीने लिहिले, “अहमदाबादमध्ये इतिहास रचला गेला. संपूर्ण संघ, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन. तुमचा खेळ पाहताना खूप आनंद झाला. कोच साहेब, तुमच्यावर हास्य खूप छान दिसते. हसतमुख राहून दाखवलेली जिद्द हे खरोखरच जबरदस्त कॉम्बो आहे. सगळ्यांनी हा क्षण मनापासून एन्जॉय करा आणि जसप्रीत बुमराह बद्दल काय लिहायचे? तो खरा चॅम्पियन बॉलर आहे.”

गंभीर जुलै २०२४मध्ये भारताचा मुख्य प्रशिक्षक बनला. त्यानंतर भारतीय टी२० संघाने उत्तम प्रदर्शन केले. कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत गंभीरने अनेक विजय मिळवले. तसेच या जोडीने एकही टी२० मालिका गमावलेली नाही. आता टी२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद जिंकत या जोडीने आणखी मोठे यश प्राप्त केले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या फलंदाजीबरोबर गोलंदाजीही उत्तम झाली. जसप्रीत बुमरहाने ४ आणि अक्षर पटेलने ३ विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. त्यामुळे न्यूझीलंड १९व्या षटकातच सर्वबाद झाला आणि भारत तिसऱ्यांदा टी२०चा चॅम्पियन ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---