अफगाणिस्तान संघाची विश्वचषक 2023मधील सुरुवात खूपच खराब राहिली. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या आपल्या पहिल्याच सामन्यात त्यांना 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. आता अफगाणिस्तान दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने मोठ-मोठी विधानं केली आहेत. यात त्याने विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्या वादाबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला कर्णधार?
सामन्यापूर्वी संघाच्या फिरकीपटूंविषयी बोलताना हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) म्हणाला की, “आम्ही नेटमध्ये शानदार फिरकीपटूंसोबत खेळतो. राशिद, मोहम्मद नबी, नूर अहमद आणि मुजीबला पाहिलं, तर आम्ही त्यांच्याविरुद्ध दररोज खेळतो. त्यामुळे मला वाटते की, फिरकी गोलंदाजी खेळण्यात आमचा संघ चांगला आहे.” तो पुढे असेही म्हणाला की, “तुम्हाला माहिती आहे की, त्या सामन्यात आम्ही संघर्ष केला होता. मात्र, एका सामन्याच्या आधारे असे म्हणता येणार नाही की, आमचे फलंदाज फिरकीपटूंचा सामना करू शकत नाहीत. तो सामना भूतकाळाची गोष्ट आहे आणि आम्हाला माहिती आहे की, आम्ही फिरकीपटूंविरुद्ध चांगले खेळू शकतो. आम्ही पुढील सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू.”
“मी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी म्हटले होते की, फलंदाजी विभाग म्हणून आम्ही शानदार क्रिकेट खेळू. फिरकी गोलंदाजी विभागात आम्ही चांगले आहोत, पण फक्त एका विभागाने तुम्ही सामना जिंकू शकत नाहीत. सामना जिंकण्यासाठी आम्हाला धावा कराव्या लागतील. बांगलादेशविरुद्ध आम्ही असे करू शकलो नव्हतो,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.
विराट-नवीन वादावर प्रतिक्रिया
आयपीएल 2023 दरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen Ul Haq) यांच्यात झालेल्या वादाविषयी त्याने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “भारत आमच्यासाठी घरासारखा आहे. आम्ही इथे खूप खेळलो आहोत. भारताच्या लोकांना अफगाणिस्तान संघ आवडतो. मैदानावर कोणताही खेळाडू नियंत्रण गमावू शकतो. त्यामुळे हे भारत आणि अफगाणिस्तानला जोडून पाहिले नाही पाहिजे. हे कोणासोबतही होऊ शकते. तुम्ही पाहाल, आमच्या संघातील अधिकतर खेळाडू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांसारख्या भारतीय खेळाडूंना आदर्श मानतात.”
भारताशी कधी होणार सामना?
अफगाणिस्तान संघाला आपला पुढील सामना भारताविरुद्ध 11 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम (Arun Jaitley Stadium) येथे पार पडणार आहे. या सामन्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (icc odi wc 2023 afghanistan captain hashmatullah shahidi big statement about naveen ul haq and virat kohli ahead of ind vs afg )
हेही वाचा-
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर बाबर आझमची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही तर सुरुवातीच्या…’
‘मी ऍक्टिंग करत होतो…’, सामन्यानंतर पाकिस्तानचा मॅचविनर रिझवानचा वेदनेविषयी मोठा गौप्यस्फोट