आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2027 च्या तयारीने वेग घेतला असून, काल 30 जुलै रोजी आयसीसीने (ICC) या स्पर्धेसाठी 12 अधिकृत यजमान स्थळांची घोषणा केली. विशेष म्हणजे, 24 वर्षांच्या कालावधीनंतर एकदिवसीय विश्वचषक आफ्रिकेत परतत आहे. यावेळी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत.
जोहान्सबर्ग येथे आयोजित एका भव्य समारंभात यजमान शहरांची घोषणा करण्यात आली. विश्वचषकाचे सामने एकूण 12 ठिकाणी खेळवले जातील. दक्षिण आफ्रिकेत आठ, झिम्बाब्वेमध्ये तीन आणि नामिबियाची राजधानी विंडहोक येथे एक सामना होईल.
यापूर्वी, 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांनी संयुक्तपणे एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. आता 2027 मध्ये ही स्पर्धा आफ्रिकेत परतत आहे. मात्र, यावेळी केनियाऐवजी नामिबियाचा यजमान देश म्हणून समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, नामिबिया पहिल्यांदाच आयसीसीच्या वरिष्ठ स्तरावरील स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी यजमान शहरांची घोषणा आणि स्पर्धेच्या ब्रँडचे अनावरण याला 2027 च्या विश्वचषकाच्या दिशेने वाटचाल करतानाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, हा विश्वचषक जगभरातील क्रिकेट चाहत्यांना एकत्र आणेल आणि या खेळातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एका स्पर्धेबद्दलची उत्सुकता अधिक वाढवेल.
आयसीसीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात 14 संघ सहभागी होती. ज्यामध्ये एकूण 57 सामने खेळवले जातील.
ही स्पर्धा तीन टप्प्यांच्या नवीन फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. सर्वप्रथम, 12व्या ते 14व्या क्रमांकावर असलेल्या तीन संघांमध्ये ‘सुपर सिरीज’ खेळवली जाईल. त्यानंतर, 12 संघांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल आणि प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर सर्व संघांविरुद्ध सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ आणि सातव्या क्रमांकावरील सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ ‘सुपर-7’ फेरीत प्रवेश करतील. सुपर-7 फेरीत एकूण 21 सामने खेळवले जातील.
त्यानंतर, अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत, सुपर-7 टप्प्यातील अव्वल क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी भिडेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एकमेकांशी स्पर्धा करतील.
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 12 अधिकृत स्टेडियम्स
दक्षिण आफ्रिका
वँडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सेंच्युरियन, त्श्वाने
न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केप टाउन
किंग्समीड क्रिकेट ग्राउंड, डर्बन
सेंट जॉर्ज पार्क, गेबेर्हा
मंगांग ओव्हल, ब्लूमफॉन्टेन
बोलँड पार्क, पार्ल
बफेलो पार्क, ईस्ट लंडन (कुगोम्पो सिटी)
झिम्बाब्वे
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
फाले मोसी-ओआ-तुन्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, व्हिक्टोरिया फॉल्स
नामिबिया
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक






