ऑस्ट्रेलियाची स्टार टेनिस महिला खेळाडू एश्ले बार्टी हिने शनिवारी (१० जुलै) विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. हे तिच्या कारकिर्दीतील पहिले विम्बल्डन तर, दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद होते. यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एक जुना व्हिडिओ शेअर करून तिचे अभिनंदन केले आहे. या व्हिडिओमध्ये बार्टी क्रिकेटचा सराव करताना दिसून येतेय.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आयसीसीने लिहिले आहे की, ‘महिला बिग बॅश लीगची माजी खेळाडू एश्ले बार्टीचे २०२१ विम्बल्डन चॅम्पियन झाल्याबद्दल अभिनंदन.’
शनिवारी महिला एकेरीच्या अजिंक्यपद सामन्यात बार्टीने झेक प्रजासत्ताकाच्या करोलिना प्लिस्कोव्हाचा ६-३, ६-७, ६-३ असा पराभव केला.
Congrats to former WBBL player @ashbarty on becoming 2021 @Wimbledon champion! 👏 pic.twitter.com/JbkMwIZrGl
— ICC (@ICC) July 11, 2021
अव्वल क्रमांकाची टेनिसपटू आहे बार्टी
महिलांच्या एटीपी टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बार्टी हिला या स्पर्धेत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. तिने या अपेक्षा पूर्ण करत अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवला. तिचे हे कारकिर्दीतील केवळ दुसरे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी तिने २०१९ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविलेले.
माजी क्रिकेटपटू आहे बार्टी
यूएस ओपन २०१४ नंतर बार्टीने आपल्या टेनिस कारकीर्दीपासून ब्रेक घेत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले होते. एका वर्षानंतर तीने ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मध्ये खेळताना ब्रिस्बेन हीटचे प्रतिनिधित्व केले होते. तिने क्रिकेटचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही.
बार्टी बिग बॅशमध्ये केवळ १० सामने खेळली. ब्रिस्बेन हिट संघासाठी तिची सर्वोच्च धावसंख्या ३९ धावा होती. नंतर ती पुन्हा टेनिसकडे वळली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. बार्टीने २०१९ मध्ये एका मुलाखतीत म्हटले होते की, क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी एक विशेष गोष्ट होती. क्रिकेट आणि टेनिस या दोन्हीमध्ये पारंगत असणारी ती किंबहुना एकमेव खेळाडू ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही ‘या’ क्रिकेटपटूंनी टाकला नाही एकही चेंडू