---Advertisement---

अर्शदीपमुळे अश्विनचा विक्रम धोक्यात, टी20 वर्ल्डकपमध्ये अव्वल क्रमांकापासून केवळ ‘एवढी’ पावले दूर

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 4:10 PM
---Advertisement---

भारताची टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात चांगली झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी ( ७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या यूएसएविरुद्धच्या सामन्यात भारताने २९ धावांनी विजय मिळवला. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने पुन्हा एकदा संघासाठी उत्तम सुरूवात केली. त्याने सामन्यात चार षटकात १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यामुळे भारताचा दिग्गज गोलंदाजाचा विक्रम मात्र धोक्यात आला आहे.

अर्शदीपचा हा त्याच्या कारकिर्दीतील तिसरा टी२० विश्वचषक आहे. त्याने मागील दोन्ही स्पर्धांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामुळे तो टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असून लवकरच पहिल्या स्थानी येण्याची शक्यता आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत १५ सामने खेळताना २९ विकेट्स घेतल्या आहेत.

अर्शदीपच्या खतरनाक या फॉर्ममुळे आर अश्विनचा विक्रम धोक्यात आला आहे. अश्विनने भारतासाठी टी२० विश्वचषकाचे २४ सामने खेळले असून त्यात त्याने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. यावरून अश्विनला मागे टाकण्यासाठी अर्शदीपला केवळ ४ विकेट्सची आवश्यकता आहे.

या यादीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने या स्पर्धेच्या १८ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला ताप आल्याने यूएसएविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नाही.

त्याचबरोबर टी२० विश्वचषकात १५ सामन्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या खेळाडूंच्या यादीतही अर्शदीप संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आला आहे. यामध्ये एनरिक नॉर्खिया ३० विकेट्ससह पहिल्या, तर वानिंदू हसरंगानेही २९ विकेट्स घेतल्या आहेत.

यूएसएविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती. सुरूवातीला लवकर विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सांभाळला. त्याने केलेल्या धमाकेदार नाबाद अर्धशतकी खेळीमुळे यजमान संघाने २० षटकात ९ विकेट्स गमावत १६१ धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत संघाचा विजय सोपा केला.

या स्पर्धेत भारताचा पुढील सामना १२ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

टी२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
३२ – आर अश्विन
२९ – अर्शदीप सिंग*
२६ – जसप्रीत बुमराह*
२५ – हार्दिक पांड्या
*
२२ – रविंद्र जाडेजा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---