आज महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला आणि ५ व्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले.
आत्तापर्यंत ७ वेळा महिला टी२० विश्वचषक खेळवण्यात आले आहेत. या सर्व विश्वचषकात भारतीय संघ खेळला आहे. पण टी२० विश्वचषकात भारतीय संघाला विश्वचषक जिंकता आला नाही. भारताने याआधी २००९, २०१० आणि २०१८ या टी२० विश्वचषकामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र तिन्ही वेळेस भारतीय संघ उपांत्य सामन्यात पराभूत झाला होता.
आजपर्यंत कोणत्याही भारतीय महिला कर्णधाराला वनडे किंवा टी२० विश्वचषक जिंकता आला नाही.
याआधी कपिल देव, एमएस धोनी, मोहम्मद कैफ, सौरव गांगुली, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने किमान एक आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
सर्वात प्रथम वरिष्ठ पुरुष भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ला विश्वचषक जिंकला. हे भारताचे पहिले आयसीसीचे विजेतेपद ठरले. त्यानंतर २००२मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ भारतीय संघाने श्रीलंकेसह संयुक्तरित्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले. त्यावेळी पावसामुळे भारत आणि श्रीलंका संघातील अंतिम सामना पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते.
यानंतर वरिष्ठ पुरुष भारतीय संघाने २००७ चा पहिला टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन आयसीसी ट्रॉफी धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला.
तसेच १९ वर्षांखालील विश्वचषक भारताने आत्तापर्यंत ४ वेळा जिंकला आहे. तसेच या चारही वेळी भारताचे कर्णधार वेगवेगळे होते. सर्वात आधी १९ वर्षांखालील भारतीय संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली २००० साली विश्वचषक जिंकला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २००८ला, उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली २०१२ला आणि पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली २०१८ ला १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला.
भारताचे (युवा, पुरुष, महिला) आयसीसी स्पर्धांचे विजेते कर्णधार –
कपिल देव – पुरुष वनडे विश्वचषक १९८३
सौरव गांगुली – चॅम्पियन्स ट्रॉफी २००२
एमएस धोनी – टी२० पुरुष विश्वचषक २००७, पुरुष वनडे विश्वचषक २०११, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३
मोहम्मद कैफ – १९ वर्षांखालील विश्वचषक २०००
विराट कोहली – १९ वर्षांखालील विश्वचषक २००८
उन्मुक्त चंद – १९ वर्षांखालील विश्वचषक २०१२
पृथ्वी शॉ – १९ वर्षांखालील विश्वचषक २०१८






