क्रिकेटच्या मैदानावर शांत राहून चौकार, षटकार किंवा बाद झाल्याचा इशारा देणारे आयसीसी पॅनेलचे पंच अनिल चौधरी सध्या झाडावर तर कधी घराच्या टेरेसवर चढून फोन हवेत फिरवताना दिसत आहेत. त्यांचे हे रूप सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारे आहे.
भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या अव्वल क्रिकेट पंचांमध्ये समावेश असणारे चौधरी (Anil Chaudhari) यांना आपल्या गावात रहावे लागत आहे. जिथे खराब नेटवर्कमुळे त्यांना मोकळ्या रानातदेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
झाले असे की, चौधरी हे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वनडे सामन्यांचे पंच होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे ही मालिका रद्द करण्यात आली. त्यामुळे ते आपल्या उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यामधील डांगरोल या गावात आले होते.
यावेळी चौधरी म्हणाले की, “मी १६ मार्चला आपल्या २ मुलांसह खूप दिवसांनंतर गावी आलो होतो. त्यामुळे मी एक आठवडा तरी येथे घालविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यानंतर लगेच लॉकडाऊनची घोषणा झाली. मी लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन करत आहे. तर माझी आई आणि पत्नी दिल्लीमध्ये आहेत.”
आतापर्यंत २० वनडे आणि २८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये पंचाची भूमिका साकारणारे चौधरी आता गावातील लोकांना वैयक्तिक अंतर राखण्याचे आवाहन करत आहेत. तसेच कोविड-१९विरुद्ध जागरूक राहण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. असे असतानाही नेटवर्कच्या समस्येमुळे त्यांना अनेक ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. यामध्ये आयसीसीच्या कार्यशाळेचाही समावेश आहे.
याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “माझ्या गावामध्ये नेटवर्कची सर्वात मोठी समस्या आहे. आम्हाला येथे कोणाशीही चर्चा करता येत नाही. तसेच इंटरनेटचा वापरदेखील करता येत नाही. त्यामुळे त्यांना गावातून बाहेर जावे लागते. तसेच विशिष्ट टेरेस तसेच झाडावर जावे लागते. तिथेही कधी कधी नेटवर्क नसते.”
या दरम्यानचे काही फोटो चौधरी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते झाडावर चढून फोन करताना दिसत आहेत.
यावेळी चौधरी म्हणाले की, “आता सर्वात मोठी समस्या ही मुलांच्या ऑनलाईन तासिकांबद्दल उद्भवली आहे. यामध्ये दिल्ली, देहराडून, रुडकी या शहरांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तासिकेत सहभागी होता येत नाही. माझा मुलगा हिंदू कॉलेजमध्ये शिकतो. त्याचे तास (वर्ग) सुरु झाले आहेत. परंतु इंटरनेट नसल्यामुळे त्याला या समस्येला सामोरे जावे लागत आहे.”
चौधरी पुढे म्हणाले की, “मागील वर्षापासून इंटरनेटची कमतरता ही एक समस्या बनली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. दिल्लीपासून माझे गाव केवळ ८५ किमी दूर असताना ही परिस्थिती आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट आणि आकड्यांवरील प्रेमाचा मिलाफ
-भारतात येऊन भारतालाच चारीमुंड्या चीत करायचं म्हणतोय हा खेळाडू
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक






