---Advertisement---

विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाने घोषीत केला या संभाव्य खेळाडूंचा संघ

On: शुक्रवार, एप्रिल 5, 2019 5:24 PM
---Advertisement---

विश्वचषक २०१९ला आता जेमतेम दीड महिना राहिलेला असताना जगातील संघांनी आपले संघ घोषीत करण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडपाठोपाठ संघ घोषीत करणारा पाकिस्तान दुसरा देश ठरला आहे.

परंतु पाकिस्तानने आपला संभाव्य २३ खेळाडूंचा संघ घोषीत केला आहे. पुढील आठवड्यात यापैकी १५ खेळाडूंची विश्वचषकासाठी निवड होणार आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक अध्यक्ष असलेल्या निवड समितीने या संघाची निवड केली आहे.

या संघातून काही मोठ्या खेळाडूंना वगळताना काही आश्चर्यकारक नावांचा समावेश करण्यात आला आहे.

या संघातून उमर अकमल या अनुभवी खेळाडूला वगळण्यात आले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत २ वर्षांनी कमबॅक केले होते. परंतु ५ सामन्यांच्या मालिकेत त्याला केवळ १५० धावा करता आल्या. ही मालिका पाकिस्तान संघाने ०-५ अशी गमावली. हा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र चांगली कामगिरी करत आहे. आज जेव्हा संघ जाहीर झाला तेव्हाच त्याने पाकिस्तान कपमध्ये बलुचिस्तानकडून ६६ चेंडूत ९९ धावांची शानदार खेळी केली. शिवाय दोन दिवस आधीच त्याने नाबाद १३६ धावांची विजयी खेळी केली होती.

वहाब रियाजलाही या संभाव्य संघात स्थान देण्यात आले नाही. ३३ वर्षीय वहाब रियाज हा पाकिस्तानचा २०११ आणि २०१५ विश्वचषकातील प्रमुख गोलंदाज होता. त्यानेही देशांतर्गंत क्रिकेटमध्ये वनडेत सध्या चमकदार कामगिरी केली आहे.

ज्या खेळाडूंची विश्वचषकात निवड झाली आहे त्या २३ खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी १५ आणि १६ एप्रिल रोजी नॅशनल क्रिकेट अॅकडमी, लाहोर येथे बोलविण्यात आले आहे. पाकिस्तान आपला अंतिम १५ खेळाडूंचा संघ १८ एप्रिल रोजी घोषीत करणार आहे.

पाकिस्तानने या संभाव्य खेळाडूंमध्ये ४ सलामीवीरांचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पणातच शतकी खेळी करणाऱ्या अबीद अलीचा यात समावेश आहे.

मागील काही दिवसांपुर्वी दोन ऑपरेशन झालेल्या अनुभवी मोहम्मद हफिजचाही या संघात समावेश आहे. तो संघातील शोएब मलिकनंतरचा सर्वात अनुभवी खेळाडू असेल.

पाकिस्तानचा संभाव्य २३ खेळाडूंचा संघ-

सर्फराज अहमद, अबीद अली, असिफ अली, बाबर आझम, फहिम अश्रफ, फकार झमान, हॅरिस सोहेल. हसन अली, इमाद वसिम, इमाम उल हक, जुनिद खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफिज, मोहम्मद हुसेन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान,  शादाब खान, शाहिन शाह आफ्रिदी, शान मसूद, शोएब मलिक, उस्मान शिन्वंरी, यासीर शाह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment