भारतीय संघाने आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. भारताने रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) स्पर्धेच्या 29व्या सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी नमवले. हा भारताचा स्पर्धेतील सलग सहावा विजय ठरला. या विजयासह भारतीय संघ पुन्हा एकदा पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी विराजमान झाला. लखनऊत खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा धुव्वा उडवताच भारतीय संघाने विश्वचषकातील खास विक्रम नावावर केला.
इंग्लंडवर दणदणीत विजय
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 87 धावांची खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 9 विकेट्स गमावत 229 धावा केल्या. यावेळी असे वाटत होते की, ही धावसंख्या खूपच कमी आहे आणि कदाचित दवाचा प्रभाव पाहायला मिळेल, ज्याने आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला मदत होईल.
मात्र, झाले भलतेच. इंग्लंड संघाने डावाच्या सुरुवातीला कोणतीही विकेट न गमावता 30 धावा केल्या होत्या. मात्र, ज्यावेळी सलामीवीर डेविड मलान जसा संघाच्या 30 धावांवर बाद झाला, त्यानंतर इंग्लंडची अवस्था कठीण झाली. त्यांचे एका पाठोपाठ एक विकेट्स पडत गेल्या. अशात संपूर्ण संघाचा डाव अवघ्या 129 धावांवर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. यावेळी भारताकडून मोहम्मद शमीने 4, तर जसप्रीत बुमराह याने 3 विकेट्स नावावर केल्या.
भारतीय संघाचा विक्रम
अशाप्रकारे भारतीय संघ (Team India) आता वनडे विश्वचषक (ODI World Cup) इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा दुसरा संघ बनला. भारताने न्यूझीलंडला पछाडत दुसरे स्थान मिळवले. इंग्लंडला पराभूत करताच भारताने विश्वचषक इतिहासातील 59वा विजय साकारला. तसेच, सर्वाधिक विजयाच्या बाबतीत न्यूझीलंडला पछाडले. न्यूझीलंडने 95 सामन्यात 58 विजय मिळवले होते. तसेच, भारताने 90 सामन्यात 59 विजय मिळवण्याचा विक्रम केला.
तसं पाहिलं, तर विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवणारा 5 वेळचा विजेता संघ ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 100 सामन्यात 73 विजय मिळवले आहेत. त्यांचा हा विक्रम लवकर तुटेल असे दिसत नाही. (icc world cup 2023 india surpasses new zealand to become the second team to win the most odi world cup matches)
हेही वाचा-
इंग्लंडकडून ‘100 गुना लगान’ घेत टीम इंडिया अव्वल क्रमांकाच्या सिंहासनावर विराजमान, गतविजेते वाईट स्थितीत
नामुष्कीजनक पराभवानंतर बटलर म्हणतोय, “आज अपेक्षा होती मात्र भारतीयांनी…”