सध्या संपूर्ण जगाचे लक्ष २०२२ साली होणाऱ्या टी२० विश्वचषकाकडे वेधले आहे. त्यामुळे सर्वत्र टी२० क्रिकेटचे वारे वाहत आहे. मात्र, टी२० क्रिकेटच्या धामधुमीत सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. २०२१ ते २०२३ या दोन वर्षांच्या मोठ्या कालावधीत कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. कसोटी अजिंक्यपदचा हा दुसरा हंगाम आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीच्या मैदानावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.
आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाण जवळपास निश्चित केले आहे. आयसीसी २०२३ मध्ये इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना आयोजित करण्याची तयारी करत आहे. आयसीसीला २०२३ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना आयोजित करायचा आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी लॉर्ड्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सुरू असलेल्या कसोटीच्या दुस-या दिवशी ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले की, “मला वाटते की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्सवरच ठरवला जावा, हा हेतू नेहमीच होता. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना जून २०२३मध्ये होणार आहे, त्यामुळे अनेक ठिकाणे आपोआप बाहेर होतात. आता आपण कोरोनापासून सावरलो आहोत. अशा परिस्थितीत अंतिम सामन्याची सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यानंतरच त्याचे आयोजन लॉर्ड्सवर व्हावे, हा आमचा हेतू आणि विचार आहे.”
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ अंतिम सामना खेळले होते. हा सामना साऊथहंम्पटनमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतावर विजय मिळवून पहिले कसोटी चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता.
आता सध्या गतविजेता न्यूझीलंड संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे, तर उपविजेता भारत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भारताकडे इतर सर्व संघाच्या बदल्यात सर्वाधिक अंक आहेत. मात्र, जिंकण्याच्या सरासरीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भारतापेक्षा सरस ठरले आहेत. त्यामुळे आता यंदाच्या हंगामात भारताला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी अधिकाधिक सामने जिंकावे लागणार आहेत.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा, चाहत्याला ग्रेटभेट देत जिंकले हृदय
‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला
शेवटी त्याने इंग्लंडला विश्वविजेते बनविलेच! कहाणी ‘बिग बेन’ ची