भारतीय संघ बर्याच दिवसापासून वेगवान गोलंदाज असणारा अष्टपैलू खेळाडू शोधत आहे. भारतीय संघाकडे हार्दिक पंड्या आहे, मात्र २०१९ साली त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने खूप कमीवेळी गोलंदाजी केली. याच कारणामुळे त्याला भारताच्या कसोटी संघातून बाहेर जावे लागल्याचीही मध्यंतरी चर्चा झाली होती. त्यामुळे सध्या हार्दिकची गोलंदाजी हा मोठा प्रश्न भारतीय संघासमोर आहे. दरम्यान, याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने प्रतिक्रिया दिली आहे.
अजित आगरकरला असा विश्वास आहे की जर पंड्याने पुन्हा गोलंदाजीला सुरुवात केली तर भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीचे अनेक प्रश्न सुटतील.
भारतीय संघाचे लक्ष आता आगामी टी२० विश्वचषकावरही आहे. टी२० विश्वचषकामध्ये पंड्याच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला अधिक संतुलन मिळेल, असे मत अजित आगरकरने व्यक्त केली आहे. अजित आगरकरला अशीही आशा व्यक्त केली आहे की श्रीलंका दौर्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेत हार्दिक पंड्या गोलंदाजी करताना दिसेल.
सध्या भारताचा मर्यादीत षटकांच्या संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात हार्दिक पंड्याचाही समोवेश आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी भारताच्या या अखेरच्या मर्यादीत षटकांच्या मालिका आहेत.
अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या योग्य
४३ वर्षीय अजित आगरकरने सोनी स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. त्याने सांगितले की ‘संघ सहाव्या गोलंदाजीचा पर्याय शोधत आहे आणि हार्दिक पंड्या हा एक चांगला पर्याय आहे. तो एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. आशा आहे की तो गोलंदाजी करेल, कारण त्याच्या गोलंदाजीमुळे विराट कोहलीसाठी बर्याच समस्या सुटतील.’
हार्दिकने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत केली होती गोलंदाजी
यापूर्वी हार्दिक पंड्या यावर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत गोलंदाजी करताना दिसला होता. परंतु, आयपीएल २०२१ चे सत्र स्थगित होईपर्यंत त्याने मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी केली नाही. त्यामुळे, तो अजूनही कितपत गोलंदाजी करु शकतो, याबद्दल स्पष्टता नाही. तरी श्रीलंका दौऱ्यातील सरावावेळी तो गोलंदाजी करताना दिसला आहे. त्यामुळे अनेकांना तो सामन्यांतही गोलंदाजी करेल ही आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बिडीच्या पॅकेटवर झळकला मेस्सी, तर नेटकऱ्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
मोठी बातमी! रिषभ पंत पाठोपाठ भारतीय संघातील ‘हा’ सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह