इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने तो जर भारतीय असता तर त्याला इशांत शर्मा व्हायला आवडले असते, असे म्हटले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि जोफ्रा आर्चर यांनी मागीलवर्षी काउंटी चॅम्पियनशीप दरम्यान ससेक्स संघाकडून खेळताना एकत्र वेळ घालवला आहे.
आर्चरने त्याच्या आणि इशांतच्या गोलंदाजीत साम्य असल्याचे सांगितले आहे. तो आयएएनएसशी बोलताना म्हणाला, ‘इशांत मागीलवर्षी ससेक्स संघात आमच्याबरोबर होता. तो मला माझी आठवण करुन देतो.’
‘तो चेंडू आत स्विंग करतो आणि बाहेर खूप कमी स्विंग करतो. त्यामुळे मला वाटते आम्ही दोघे सारखे आहोत. तोही उंच आहे. त्यामुळे जर मला भारतीय गोलंदाज बनायचे असते तर मी संभवत: इशांतची निवड केली असती.’
२४ वर्षीय आर्चर आजपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात इंग्लंडकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. त्याआधी तो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळला आहे. तसेच तो काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्येही राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. या संघात इंग्लंड संघातील बेन स्टोक्स, जॉस बटलर हे देखील खेळले.
त्यामुळे इंग्लंड संघात पदार्पण करण्याआधी आयपीएल दरम्यान या खेळाडूंबरोबर वेळ घालवणे फायद्यचे ठरले असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघात शानदार स्वागत झाल्याचेही आर्चरने सांगितले.
‘माझे शानदार स्वागत झाले. त्यामुळे मला थेट संघाचा भाग असल्याचे वाटले. काही खेळांडूबरोबर आयपीएलमध्ये खेळल्याने मला मदत झाली. मी त्यांच्यापैकीच एक असल्याचे मला त्यांनी जाणवून दिले आणि मी संघात आल्याने ते खूश असल्याने मी देखील आनंदी आहे.’
‘मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा माझ्यासाठी कठिण होते. मी खूप मोठी धोका पत्करला होता. ज्याचा मला कोणता फायदा मिळेल की नाही याची खात्री नव्हती. इंग्लंडकडून खेळण्यासाठी मी ७ वर्षे वाट पाहत होतो. आता मी इंग्लंड संघात आल्याने प्रतिक्षेचे फळ मिळाले आहे.’
याबरोबरच तो आयपीएलमध्ये मोठ्या प्रेक्षकसंख्येसमार खेळण्याने तूमच्या क्षमतांना आव्हान मिळत असल्याचेही त्याने म्हटले आहे. तसेच त्याने शेवटी म्हटले आहे की तूमच्या क्षमतांवर आणि शैलीवर विश्वास ठेवून सराव करत राहणे महत्त्वाचे आहे. काहीवेळेस एखादा दिवस फलंदाजांचाही असू शकतो हे देखील समजले पाहिजे.
आर्चरला सुरुवातीला विश्वचषकासाठी इंग्लंडच्या १५ जणांच्या संघात संधी देण्यात आली नव्हती पण नंतर त्याचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे आता या विश्वचषकात आर्चरची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचेच लक्ष आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही त्याला इंग्लंड संघातील एक्स फॅक्टर असल्याचे म्हटले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकादरम्यान विराटबरोबर फोटो काढण्याची चाहत्यांना रोज मिळणार संधी, जाणून घ्या कारण
–६० सेकंड्स चॅलेंजसह असा पार पडला २०१९ विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा
–Video: टीम इंडियातील हा खेळाडू आहे सर्वात वाईट डान्सर, जडेजाने केले गमतीशीर खूलासे