चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघाने सामन्यावर पूर्ण पकड मिळवलेली दिसून येते. भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर या सामन्यात विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष ठेवले आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असला तरी, आशियातील मागील आकडेवारी पाहता भारत या सामन्यात विजय मिळवणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
भारतीय संघाने ठेवले इंग्लंडसमोर ४८२ धावांचे लक्ष
पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीनंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात खराब होत चाललेल्या खेळपट्टीवर धैर्याने फलंदाजी केली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ६२ धावांची झुंजार खेळी केली. गोलंदाजीत कमाल दाखवलेल्या ‘लोकल बॉय’ रविचंद्रन अश्विनने फलंदाजीत इंग्लंडच्या गोलंदाजांना नामोहरम केले. त्याने १०६ धावांची शतकी खेळी केली. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले. भारतीय संघाचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. त्याबरोबरच पहिल्या डावातील आघाडीसह इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान दिले.
ही आकडेवारी म्हणते भारत सामना जिंकणार
भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष ठेवले आहे. आशियातील खेळपट्ट्यांवर अशा प्रकारचे आव्हान यापूर्वी कधीही कोणत्याही संघाला पार करता आले नाही. फेब्रुवारी २०२१ मध्येच वेस्ट इंडीज संघाने बांगलादेश विरुद्ध मिरपुर कसोटीत ३९५ धावा करून विजय मिळविला होता. भारतीय उपखंडात यशस्वीरित्या धावांचा पाठलाग करत विजय मिळविण्याबाबत हा विश्वविक्रम आहे.
दुसरीकडे भारतात चौथ्या डावात सर्वाधिक धावांचे विजयी लक्ष गाठण्याचा पराक्रम भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच केला होता. २००८ सालच्या चेन्नई कसोटीत भारताने ३८७ धावांचे लक्ष पार केले होते.
भारतीय संघाचा विजय निश्चित
वरील आकडेवारीचा विचार केल्यास भारताने इंग्लंडसमोर ठेवलेले ४८२ धावांचे आव्हान पार करणे इंग्लडसाठी मोठी परिक्षा पाहाणारे ठरणार आहे. खराब होत चाललेल्या खेळपट्टीवर इंग्लंडचे फलंदाज भारतीय फिरकीसमोर किती वेळ तग धरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
इसके मुंह पर भी डाल सकता है..! चेन्नई कसोटीतील पंतची कॉमेंट्री तूफान व्हायरल, बघा व्हिडिओ
ब्रेकिंग! भारताच्या गुणवान यष्टीरक्षक-फलंदाजाची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
अजब योगायोग ! सिराजच्या ‘त्या’ कृतीने करून दिली सहा वर्षांपूर्वीच्या रैनाची आठवण