ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्याला काल (११ डिसेंबर) सुरुवात झाली होती. पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने आज दुसर्या डावात फलंदाजी करताना आपली आघाडी अजून भक्कम केली आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि शुभमन गिलने दमदार अर्धशतके झळकावत पहिल्या सत्रात भारताला १९७ धावांची आघाडी मिळवून दिली.
गिलचं आक्रमक अर्धशतक
दुसर्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरीचे प्रदर्शन केले होते. प्रथम फलंदाजी करताना एकवेळ भारताची ९ बाद १२३ अशी दयनीय अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर जसप्रीत बुमराहने झुंजार अर्धशतक झळकावत भारताला १९४ धावांचा टप्पा गाठून दिला. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन फलंदाजी देखील अवघ्या १०८ धावांवर सर्वबाद झाली. त्यामुळे भारताला ८६ धावांची आघाडी मिळाली.
दुसर्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ अवघ्या ३ धावा करून तंबूत परतला. मात्र त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलने सलामीवीर मयंक अग्रवालच्या साथीने डाव सावरला. या दोघांनीही अर्धशतके झळकाविली. मयांकने १२० चेंडूत ६१ धावा काढल्या, तर गिलने आक्रमक फलंदाजी करत ७८ चेंडूत ६५ धावा काढल्या.
सलामीच्या स्थानासाठी भक्कम दावेदारी
भारताच्या कसोटी संघात एका सलामीवीराची जागा मयंक अग्रवालच्या रुपात नक्की आहे. त्याच्या साथीने सलामीला कोण उतरणार, हा प्रश्न आहे. पृथ्वी शॉने यापूर्वी मिळालेल्या संधीचा फायदा घेतला नाही. त्यामुळे युवा फलंदाज शुभमन गिलला या स्थानी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सराव सामन्यातील अर्धशतकाने त्याने आपली दावेदारी अधिकच मजबूत केली आहे.
संबंधित बातम्या:
– IND Vs AUS A : सराव सामन्याचा पहिला दिवस बुमराहच्या नावावर, भारताला मिळाली ८६ धावांची आघाडी
– जसप्रीत बुमराहची फलंदाजीतही कमाल; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात झळकाविले तुफानी अर्धशतक
– INDvsAUS: दुसऱ्या सराव सामन्यात विराट- पुजारा यांच्या अनुपस्थितीमुळे भारताची अवस्था दयनीय