भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी (2 डिसेंबर) कॅनबेरा येथे तिसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांतील प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले गेले. ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि पॅट कमिन्स हे या वनडे सामन्याला मुकणार, हे आधीच ठाऊक होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क हासुद्धा या सामन्यात खेळला नाही. त्याचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश का केला नाही? हा प्रश्न सर्वानाच पडला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने स्टार्कच्या अनुपस्थितीबद्दल भाष्य केले आहे.
भारतीय संघात मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, मयंक अगरवाल आणि नवदीप सैनी यांच्याऐवजी टी-नटराजन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि शुभमन गिल यांना संघात स्थान देण्यात आले होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स यांच्या जागी सीन एबॉट, कॅमेरून ग्रीन आणि अष्टोन एगर यांना संघात स्थान दिले होते.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने स्टार्कला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याबद्दल सांगितले की, “स्टार्कच्या कंबरेला आणि रिबला किरकोळ दुखापत झाली आहे, त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे.”
पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्टार्क खूपच महागडा ठरला होता. त्याने दोन्ही सामन्यात एकूण 18 षटके फेकली त्यामध्ये त्याने तब्बल 147 धावा दिल्या आणि फक्त एक गडी बाद केला.
मात्र त्याच्या जागी संघात खेळत असलेला सीन एबॉटही तिसऱ्या वनडेमध्ये प्रभावी ठरला नाही. एबॉटने 10 षटकांत 84 धावा देऊन फक्त एक गडी बाद केला.
तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (63 धावा), हार्दिक पंड्या (नाबाद 92) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 66) यांच्या दमदार खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 302 धावा केल्या. हार्दिक आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी नाबाद 150 धावांची भागीदारी केली.
कर्णधार फिंच (75 धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (59 धावा) यांनी केल्या उत्तम कामगिरी नंतरही ऑस्ट्रेलियाला 49.3 षटकांत फक्त 289 धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
‘त्या’ खेळाडूच्या आगमनाने संघात आला ताजेपणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर विराटची प्रतिक्रिया