भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियन संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. मालिकेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना संघातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन कमरेच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अनुभवी मार्नस लाबुशेनची संघात वर्णी लागली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीनच्या दुखापतीचं स्वरूप जास्त गंभीर नसून, येत्या एशेज ASHES मालिकेच्या तयारीसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तो 28 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शेफील्ड शील्ड सामन्यात खेळू शकतो. गेल्यावर्षीच त्याच्यावर कमरेची शस्त्रक्रिया झाली होती आणि काही महिन्यांपूर्वीच त्याने पुनरागमन केलं होतं.
याआधीही ऑस्ट्रेलियन संघाला अनेक दुखापतींचा सामना करावा लागला आहे. मुख्य फिरकीपटू अॅडम झॅम्पा आणि यष्टीरक्षक जोश इंग्लिस हे देखील पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाहीत. त्यांच्या जागी जोश फिलिप आणि फिरकीपटू मैथ्यू कुहनेमन यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, झॅम्पा आणि इंग्लिस दुसऱ्या वनडेपासून संघात पुनरागमन करतील.
कर्णधार पॅट कमिन्स देखील या मालिकेसाठी अनुपलब्ध असून, त्याच्याऐवजी मिचेल मार्श कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ (पहिला वनडे):
मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मैथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिशेल ओवेन, जोश फिलिप, मैथ्यू रेनशॉ, मैथ्यू शॉर्ट आणि मिचेल स्टार्क.
दुसऱ्या वनडेपासून उपलब्ध खेळाडू:
अॅडम झॅम्पा, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि आगामी मोठ्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.






