भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे . अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने पराभव केला. पहिल्या सामन्यातील झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघ या प्रकारे पुनरागमन करेल अशी शक्यता फारच कमी होती. मात्र अजिंक्यसेनेने यशस्वीरीत्या पुनरागमन करून संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे.
अनेक माजी क्रिकेट खेळाडूंनी भारताच्या या कामगिरी बद्दल संघाचे कौतुक केले आहे. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील भारतीय संघाची प्रशंसा केली आहे.अख्तरच्या मते भारतीय संघाने ऐतिहासिक पुनरागमन केले आहे, त्यामुळे मालिकादेखील त्यांनीच जिंकावी.
अख्तर म्हणाला, ”दहा-पंधरा वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल की आशियामधील कोणता संघ ऑस्ट्रेलियाला अशाप्रकारे पराभूत करेल. ही मालिका आता संघर्षमय होणार आहे. माझी इच्छा आहे की भारताने मालिका जिंकावी, कारण त्यांनी उत्कृष्ट पुनरागमन केले आहे.”
शोएब अख्तरने यादरम्यान कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे. अख्तर म्हणाला, “अजिंक्य रहाणे मैदानावर आरडाओरडा करत नाही. तो शांतपणे मैदानावर आपले मत मांडतो. त्याच्या नेतृत्वात संघाने उत्तम कामगिरी केलेली आहे.”
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्याने तिसऱ्या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया व भारतीय संघाला चांगली बातमी मिळाली असून , दोन्ही संघाचे आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व रोहित शर्मा यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मालिकेत बरोबरी केल्यानंतर आता हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशाप्रकारे मैदानात कामगिरी करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
कमिन्सच्या गोलंदाजीपुढे पुजाराचे लोटांगण चिंताजनक, दोन सामन्यात तब्बल तीनवेळा झालाय बाद
पुरुषांचा दौरा होऊ शकतो, मग महिलांचा का नाही? क्रिकेट ऑस्ट्रेलियालावर भडकले आकाश चोप्रा
भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा अव्वल क्रमांक पटकाविण्याची संधी, करावी लागेल अशी कामगिरी