वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 17व्या सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना गुरुवारी (दि. 19 ऑक्टोबर) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. अशात या सामन्यापूर्वी बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याने विराट कोहली याच्या स्लेजिंगविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चला तर, तो काय म्हणालाय जाणून घेऊयात…
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) म्हणाला की, त्याने विराटला कधीही स्लेज केले नाही. कारण, त्यामुळे तो आणखी उत्साही होतो. त्याने आपल्या गोलंदाजाला विराटपासून दूर राहण्यासही म्हटले. खरं तर, विराट कोहली याची बॅट बांगलादेशविरुद्ध चांगलीच तळपते. त्याने बांगलादेशविरुद्ध 26 सामने खेळताना 65.31च्या सरासरीने 1437 धावा केल्या आहेत. अशात, चाहत्यांना या सामन्यातही विराटकडून धमाल कामगिरीची अपेक्षा आहे.
रहीम म्हणाला की, “जगातील काही फलंदाजांना स्लेजिंग खूप आवडते. कारण, यामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण होतो. त्यामुळे मी कधीही विराटला स्लेज केले नाही. कारण, त्याला जोश येतो. मी नेहमीच आपल्या गोलंदाजांना म्हटले आहे की, त्याच्यापासून शक्य तितक्या लवकर अंतर ठेवत जावा.”
रहीमने असेही सांगितले की, जेव्हा भारताविरुद्ध तो फलंदाजी करण्यासाठी उतरला होता, तेव्हा विराटने प्रत्येक वेळी त्याला स्लेज केले. रहीमनुसार, विराट खूपच प्रतिस्पर्धी आहे आणि त्याला पराभव सहन होत नाही. खरं तर, भारताने 2007च्या विश्वचषक सामन्यात पराभूत झाल्यानंतर बांगलादेशला 2011 विश्वचषक, 2015 आणि 2019 विश्वचषकातही बांगलादेशला पराभूत केले. भारतीय संघ गुरुवारी हा आकडा 4-1 करण्याचा प्रयत्न करेल.
मुशफिकुर रहीम म्हणाला, “मी जेव्हाही विराटविरुद्ध खेळलो आहे, तेव्हा त्याने मला नेहमी स्लेज केले आहे. विराट खूपच प्रतिस्पर्धी क्रिकेटपटू आहे आणि त्याला पराभव आवडत नाही. मला त्याच्यासोबतची प्रतिस्पर्धा खूपच आवडते. तसेच, भारत आणि त्याचा सामना करण्यात जे आव्हान मिळते, तेही खूप आवडते.”
भारतीय संघाच्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर भारताने पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. आता बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून ते विजयाचा चौकार मारण्याचा प्रयत्न करतील. तसेच, बांगलादेश संघ 3 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. तसेच, आता दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. (ind vs ban 17th match cwc 2023 mushfiqur rahim says never sledge virat kohli because of this reason)
हेही वाचा-
रोहित आणि विराटपैकी कोणाची फलंदाजी आवडते? सहकाऱ्याने दिले हे उत्तर
‘रोहितमुळे टीम इंडिया विश्वचषकात…’ माजी क्रिकेटपटूची लक्षवेधी प्रतिक्रिया