भारत आणि बांग्लादेश यांच्यात पुढील महिन्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामन्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होऊ शकते. जसप्रीत बुमराहला या कसोटी मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते, त्याच्या जागी अर्शदीप किंवा खलील अहमदला संधी दिली जाऊ शकते. मात्र, या मालिकेत रिषभ पंतला संधी मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर वेगवान गोलंदाज शमीच्या खेळावर अजूनही सस्पेंस कायम आहे.
रिषभ पंतचा दुलीप ट्रॉफी संघात समावेश करण्यात आला आहे, तो भारत ‘ब’ संघाचा भाग आहे. बऱ्याच कालावधीनंतर तो कसोटी सामन्याच्या स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याने बांग्लादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला, त्यानंतर तो कार अपघाताचा बळी ठरला. 20 महिन्यांनंतर तो दुलीप ट्रॉफीद्वारे लाल चेंडूच्या स्पर्धेत पुनरागमन करेल.
दुलीप ट्रॉफीमधील सामने पंतसाठी एक प्रकारची परिक्षाच आहे. जिथे त्याला फिटनेससह त्याचा फॉर्म संतुलित करावा लागेल. बांग्लादेश मालिकेचा दावेदार मानल्या जाणाऱ्या केएल राहुलकडून रिषभ पंतला कडवी टक्कर द्यावी लागणार आहे. राहुलशिवाय युवा फलंदाज ध्रुव जुरेल हा देखील टीम इंडियात यष्टीरक्षक पदाचा दावेदार आहे. ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केले आणि त्यानेही चमकदार कामगिरी केली.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. शमी एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे आणि तो जिममध्ये घाम गाळत आहे. बीसीसीआय एनसीए अधिकाऱ्यांकडून शमीच्या प्रगतीचा अहवालही घेत आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत तर दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. दुसरा सामना दिल्लीत तर तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल.
हेही वाचा-
बांग्लादेश मालिकेपूर्वी संघाला धक्का, सरावादरम्यान स्टार खेळाडू जखमी
विनेशच्या विरोधात मोठे षडयंत्र? 53 किग्रॅ गट सोडून 50 किग्रॅ मध्ये सहभाग का?
पीआर श्रीजेशची जागा कोण घेणार? जाणून घ्या सर्वात मोठे 3 दावेदार