भारत विरुद्ध इंग्लंडच्या आगामी कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ तुलनेने नवखा असला तरी गुणवान आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना भारतात कसोटी सामने खेळायचा फारसा अनुभव नसला तरी आयपीएलमध्ये यातील बरेचसे खेळाडू खेळले असल्याने त्यांना फायदा होईल, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने या मताला विरोध केला आहे. आर्चरच्या मते टी-२० क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट यांच्यात फरक असल्याने आयपीएलचा अनुभव आगामी मालिकेत फारसा उपयोगी पडणार नाही. मालिकेपूर्वी माध्यमांशी बोलतांना त्याने हे वक्तव्य केले.
“आयपीएल आणि कसोटी क्रिकेटची तुलना नाही”
आर्चर म्हणाला, “आगामी मालिका माझ्यासाठी खास आहे. मी भारतात पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळणार आहे. यापूर्वी मी इथे मर्यादित षटकांचे सामने खेळलो आहे. त्यामुळे काही प्रमाणात परिस्थितीचा आणि खेळपट्ट्यांचा मला अंदाज आहे. परंतु, आयपीएल आणि कसोटी क्रिकेट यांची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे आयपीएलच्या अनुभवाचा मला फारसा फायदा होईल, असे वाटत नाही.”
“संघाच्या रचनेवर माझी भूमिका ठरेल”
बॉलिंग स्पेलबाबत बोलताना आर्चर म्हणाला, “माझ्या बॉलिंग स्पेलचा कालावधी आमच्या संघाच्या रचनेवर ठरेल. जर आम्ही तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळणार असू तर मला फार मोठे स्पेल टाकावे लागणार नाहीत. मात्र जर दोनच वेगवान गोलंदाज असतील तर अर्थातच मला मोठ्या स्पेलसाठी मानसिक तयारी ठेवावी लागेल.”
दरम्यान, या मालिकेत भारत आणि इंग्लंडचे संघ चार कसोटी सामने खेळणार आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने आपले स्थान पक्के केल्याने आता दुसऱ्या स्थानासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरस आहे. त्यामुळे ही मालिका रंगतदार ठरणार असून उभय संघ विजयासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसतील.
महत्वाच्या बातम्या:
मोहम्मद हफीजच्या टी10 लीग खेळण्यावर माजी पाकिस्तानी खेळाडूची कडाडून टीका
BAN vs WI : शाकिबच्या अर्धशतकाने सावरला यजमानांचा डाव, दिवसाखेर ५ बाद २४५ धावांची मजल
मालिका विजयासाठी पाकिस्तान सज्ज, दुसऱ्या कसोटीसाठी संघ केला जाहीर