अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात २४ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दिवस-रात्र असणार आहे. त्यामुळे या सामन्याला दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल. या सामन्यासाठी १७ जणांमधून अंतिम ११ जणांच्या संघात कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न भारतीय संघासमोर असणार आहे.
हा सामना दिवस-रात्र असल्याने गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. तसेच या सामन्यासाठी मोटेरा स्टेडियमच्या खेळपट्टीवर गवत असण्याची शक्यता असल्याने वेगवान गोलंदाजांना अधिक पसंती मिळू शकते.
या लेखात आपण तिसऱ्या कसोटीसाठी कोणत्या खेळाडूंना ११ जणांच्या संघात संधी मिळू शकते, याचा आढावा घेई.
सलामीवीर
तिसऱ्या कसोटीसाठी सलामीवीर म्हणून शुबमन गिल आणि रोहित शर्मा कायम असण्याची शक्यता आहे. या दोघांनी मागील काही सामन्यात एकत्र चांगली फलंदाजी केली आहे. तसेच वैयक्तिक कामगिरीही चांगली झाली आहे. रोहितने तर दुसऱ्या कसोटीत १६१ धावांची दीडशतकी खेळी केली होती.
मधली फळी
मधल्या फळीत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे कायम असतील. हे तिघेही अनुभवी खेळाडू असल्याने त्याच्यावर मोठ्या धावा करण्याची जबाबदारी असेल. तसेच यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतही अंतिम ११ जणांच्या संघात कायम असेल. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. तसेच तो मागील काही सामन्यांपासून उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याची आक्रमक खेळण्याची शैली भारतासाठी फायद्याची ठरत आहे.
अष्टपैलू खेळाडू
या सामन्यासाठी अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि आर अश्विन यांना संधी मिळू शकते. अक्षर आणि अश्विन हे दोघे फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात. तसेच हार्दिक वेगवान गोलंदाजीसाठी हातभार लावू शकतो. तरी हार्दिक पाठीची शस्त्रक्रिया झाल्याने कितपत गोलंदाजी करु शकतो हा देखील मोठा प्रश्न संघव्यवस्थापनासमोर असेल. याबरोबरच अश्विन आणि अक्षर फलंदाजीतही योगदान देऊ शकतात. अश्विनने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात शतकही सांभाळले होते.
गोलंदाज
अक्षर आणि अश्विन फिरकी गोलंदाजी सांभाळतील. तर वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव हे पर्याय असतील. तसेच जर हार्दिकला खेळवण्यात आले नाही तर मोहम्मद सिराजलाही संधी मिळू शकते. उमेश नुकताच दुखापतीतून परतला असून त्याने तंदुरुस्ती चाचणी पास केली आहे. त्यामुळे तो या सामन्यातून भारतीय कसोटी संघात पुनरागमन करु शकतो. याबरोबरच सिराज आणि बुमराह देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
तिसऱ्या कसोटीसाठी असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, हार्दिक पंड्या/मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या
ब्रेकिंग! शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात ‘या’ खेळाडूची निवड
अफाट प्रतिभेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्याय न देऊ शकलेले नरेंद्र हिरवानी
टीम इंडियातून बाहेर केलेल्या तुफानी ‘या’ खेळाडूने शतकासह दिले निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर