मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज क्रिकेट चाहत्यांची नजर खिळली आहे. आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांकडून जोरदार लढत अपेक्षित आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड यांच्यातील हा सामना सुरु झाला आहे. नाणेफेकीत इंग्लंडने बाजी मारली. हॅरी ब्रूकने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
या महत्त्वाच्या सामन्यात सूर्यकुमार यादवसाठी वानखेडे हे घरचं मैदान असल्याने भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. भारताने मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडसमोर आव्हान उभं करावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियासाठी ही सलग तिसरी उपांत्य फेरी आहे, तर इंग्लंडने सलग पाचव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत दोनदा टी20 वर्ल्ड कप जिंकला असल्याने आजचा सामना जिंकणारा संघ तिसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकणार आहे. त्यामुळे या लढतीचं महत्त्व आणखी वाढलं आहे.
वानखेडे स्टेडियमची आकडेवारीही रोचक आहे. या स्पर्धेत येथे आतापर्यंत चार सामने झाले असून त्यापैकी तीन सामन्यांत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावरील सरासरी धावसंख्या सुमारे 174 इतकी आहे. त्यामुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली तरच इंग्लंडवर दबाव निर्माण होऊ शकतो.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
भारत – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड – फिल साल्ट, जोस बटलर (यष्टिरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद.






