चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमएस चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा शनिवारी (६ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाच्या अखेर इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी चिवट झुंज दिली. दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात १८० षटकांत ८ बाद ५५५ धावा केल्या आहेत.
इशांत शर्माने १७० व्या षटकात सलग २ चेंडूत दोन विकेट्स घेतल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव झटपट गुंडाळला जाईल, अशी अपेक्षा अनेकांनी केली होती. मात्र डॉमनिक बेसने जॅक लीचला साथीला घेत इंग्लंडचा डाव पुढे नेला. त्या दोघांनी मिळून इंग्लंडला ५५० धावांचा टप्पाही पार करुन दिला. तसेच दिवसाखेरपर्यंत त्यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही.
दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात १८० षटकांत ८ बाद ५५५ धावा केल्या असून बेस ८४ चेंडूत २८ धावांवर आणि जॅक लीच २८ चेंडूत ६ धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि शहाबाज नदीमने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.
इशांत शर्माने दिले २ लागोपाठ धक्के
रुट आणि पोप यांच्या लागोपाठ विकेट गेल्यानंतर बटलरने बेसला साथीला घेत ४८ धावांची भागीदारी केली. मात्र, ही भागीदारी रंगत असतानाच इशांत शर्माने इंग्लंडच्या पहिल्या डावातील १७० व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर जोस बटलरला ३० धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर जोफ्रा आर्चर शुन्यावर त्रिफळाचीत झाला.
त्यामुळे सध्या इंग्लंडने पहिल्या डावात १७० षटकात ८ बाद ५२८ धावा केल्या असून बेस ४७ चेंडूत १७ धावांवर आणि जॅक लीच ३ चेंडूत १ धावांवर नाबाद आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने द्विशतकी खेळी केल्यानंतर बाद
तिसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर ऑली पोपला बाद करत आर अश्विनने इंग्लंडला ५ वा धक्का दिला होता. पोप ८९ चेंडूत ३४ धावा करुन बाद झाला. पण बाद होण्याआधी त्याने रुटसह ८६ धावांची धावांची भागीदारी केली. त्याला अश्विनने पहिल्या डावाच्या १५३ व्या षटकात पायचीत केले.
त्यानंतर लगेचच १५४ व्या षटकात शहाबाज नदीमने द्विशतकवीर जो रुटला बाद करत भारताच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर केला. नदीमने रुटला पायचीत केले. रुट ३७७ चेंडूत २१८ धावा करुन बाद झाला. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. पोल आणि रुट दोघेही एकामागोमाग बाद झाल्याने सध्या खेळपट्टीवर जोश बटलर आणि डॉमनिक बेस ही नवी जोडी फलंदाजी करत आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात १५७ षटकात ६ बाद ४८२ धावा केल्या असून अजून बटलर १७ चेंडूत ६ धावांवर आणि बेस ५ चेंडूत १ धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/BCCI/status/1357987625118830593
इंग्लंडचा कर्णधार जो रुटची द्विशतकी खेळी
रुटने १४३ व्या षटकात आर अश्विनच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे १०० वा कसोटी सामना खेळताना द्विशतक करणारा रुट पहिला फलंदाज बनला आहे. रुटने ३४१ चेंडूत त्याचे द्विशतक पूर्ण केले.
इंग्लंडने पहिल्या डावात १४४ षटकात ४ बाद ४४५ धावा केल्या असून अजून रुट ३४४ चेंडूत २०४ धावांवर आणि पोप ६५ चेंडूत २० धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/BCCI/status/1357970696270274560
शहाबाज नदीमने इंग्लंडला दिला चौथा धक्का
पहिल्या सत्राप्रमाणेच रुट आणि स्टोक्स दुसऱ्या सत्रातही शानदार फलंदाजी करत होते. त्यांनी शतकी भागीदारीही पूर्ण केली. आता हे दोघेही भारतीय गोलंदाजांना वरचढ ठरत जाणार असे वाटत असतानाच बेन स्टोक्सला नदीमने १२७ व्या षटकात बाद केले. स्टोक्सचा झेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेतेश्वर पुजाराने घेतला. त्यामुळे स्टोक्सचे शतक १८ धावांनी हुकले. तो ८२ धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर रुटला साथ देण्यासाठी ऑली पोप आला आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात १३२ षटकात ४ बाद ४०० धावा केल्या असून अजून रुट ३१२ चेंडूत १७५ धावांवर आणि पोप २४ चेंडूत ५ धावांवर खेळत आहे.
रुट, स्टोक्सची जोरदार फलंदाजी
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आलेली नाही. तर इंग्लंडकडून जो रुट आणि बेन स्टोक्स जोरदार फलंदाजी करत आहे.
रुट आणि स्टोक्सने दुसऱ्या दिवशी अनु्क्रमे दिडशतक आणि अर्धशतक पूर्ण झाल्यानंतरही लक्ष विचलित होऊ दिले नाही. या दोघांनीही एकमेकांची चांगली साथ देताना इंग्लंडला ३५० धावांचा टप्पा पार करुन दिला आहे. दरम्यान, या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारीही रचली आहे.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर इंग्लंडने पहिल्या डावात ११९ षटकात ३ बाद ३५५ धावा केल्या असून अजून रुट २७७ चेंडूत १५६ धावांवर आणि स्टोक्स ९८ चेंडूत ६३ धावांवर खेळत आहे. या दोघांनी ९३ धावांची नाबाद अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटचे दिडशतक, तर बेन स्टोक्सचे अर्धशतक
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या २० षटकांत भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आलेली नाही, दरम्यान भारताने २ डिआरएसचे रिव्ह्यू देखील गमावले आहेत.
याचवेळी रुटने १११ व्या षटकात शहाबाज नदीमच्या गोलंदाजीवर एकेरी धाव काढत त्याचे दिडशतक पूर्ण केले. सलग तिसऱ्या सामन्यात रुटने दिडशतकी खेळी करण्याचा कारनामा केला आहे. त्याने २६० चेंडूत त्याचे दिडशतक पूर्ण केले. त्याचे दिडशतक पूर्ण झाल्यानंतर बेन स्टोक्सनेही आक्रमक फटके खेळत अर्धशतकाला गवसणी घातली. त्याने ११३ व्या षटकात नदीमला सलग दोन चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ७३ चेंडूत त्याचे अर्धशतक केले.
इंग्लंडने पहिल्या डावात ११५ षटकात ३ बाद ३३८ धावा केल्या असून अजून रुट २६९ चेंडूत १५३ धावांवर आणि स्टोक्स ८१ चेंडूत ५० धावांवर खेळत आहे. या दोघांनी ७५ धावांची अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली आहे.
रुट, स्टोक्सची विश्वासपूर्ण सुरुवात
दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ८९.३ षटकापासून ३ बाद २६३ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. शनिवारी शतकवीर इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या साथीला बेन स्टोक्स आला आहे. या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला चांगला खेळ केला. दरम्यान, स्टोक्सने ९५ व्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर एक खणखणीत षटकारही ठोकला.
https://twitter.com/BCCI/status/1357907052111273991
स्टोक्स आणि रुटने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राची सुरुवात आत्मविश्वासपूर्ण केली आहे. स्टोक्सने पुढेही काही आक्रमक फटके मारले. त्यांच्या या चांगल्या सुरुवातीमुळे १०४ षटकांत इंग्लंडने ३०० धावांचा आकडा पार केला आहे. तसेच रुटही त्याच्या दिडशतकाच्या जवळ पोहचला आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात १०४ षटकात ३ बाद ३०३ धावा केल्या असून अजून रुट २४० चेंडूत १४२ धावांवर आणि स्टोक्स ४४ चेंडूत २६ धावांवर खेळत आहे.






