भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील वर्षी 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा आज (22 ऑगस्ट) करण्यात आली. मालिकेतील पहिला सामना 20 जून 2025 पासून खेळला जाणार असून शेवटचा सामना 31 जुलै पासून सुरू होणार आहे.
बीसीसीआयनं सोशल मीडियावर पोस्ट टाकत वेळापत्रकाची माहिती दिली. या पोस्टवर रोहित शर्माचा फोटो आहे. याचाच अर्थ या मालिकेसाठी रोहितच भारताचा कर्णधार असू शकतो. भारतीय संघ गेल्या 17 वर्षांपासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. आता रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाकडे हा वनवास संपवण्याची संधी आहे.
भारतीय संघ पुढील वर्षी 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. पहिला कसोटी सामना हेडिंग्ले, लिड्स येथे 20 जून ते 24 जून 2025 दरम्यान खेळला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान बर्मिंगहम येथे खेळला जाईल. तिसऱ्या कसोटी सामन्याला 10 जुलैला सुरुवात होणार आहे. हा सामना लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
3 कसोटी सामने झाल्यानंतर चौथ्या कसोटीपूर्वी 8 दिवसांचा ब्रेक आहे. चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून सुरू होऊन 27 जुलैपर्यंत चालेल. हा सामना मॅनचेस्टर येथे खेळला जाईल. पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना 31 जुलैपासून लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल.
भारताचा इंग्लंड दाैरा 2025
पहिला कसोटी सामना – 20-24 जून 2025, हेडिंग्ले
दुसरा कसोटी सामना – 2-6 जुलै 2025, एजबॅस्टन
तिसरा कसोटी सामना- 10-14 जुलै 2025, लाॅर्ड्स
चाैथा कसोटी सामना- 23-27 जुलै 2025, मँचेस्टर
पाचवा कसोटी सामना- 31 जुलै ते 4 ऑगस्ट, ओव्हल
हेही वाचा –
श्रीलंकेच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम! बलविंदर सिंग संधू यांचा 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
“मी थांबणार नाही…”, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि WTC चे जेतेपद पटकवाण्यासाठी रोहितने भुंकला रणशिंग!
रोहित शर्मासाठी सप्टेंबर महिना ऐतिहासिक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचणार महान विक्रम