IND vs NZ: नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडच्या डावादरम्यान गोलंदाजी करत असताना भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला. अक्षरच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हा प्रकार न्यूझीलंडच्या डावाच्या 16व्या षटकात घडला. अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या दोन चेंडूंवर त्याने केवळ तीन धावा दिल्या. मात्र तिसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरिल मिचेलने लेग स्टंपच्या बाहेर सरकत शॉर्ट ऑफ फुलर लांबीच्या चेंडूवर जोरदार फटका मारला. हा चेंडू थेट गोलंदाजाच्या डोक्यावरून जाणार होता. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात अक्षरने डावा हात पुढे केला, मात्र चेंडू थेट त्याच्या बोटाला जोरात लागून लॉन्ग ऑफच्या दिशेने सीमारेषेपलीकडे गेला.
या घटनेनंतर अक्षर पटेल वेदनेने कळवळताना कॅमेऱ्यात दिसला. चेंडूचा फटका इतका जोरात होता की त्याच्या बोटातून रक्तस्राव सुरू झाला. तत्काळ फिजिओ मैदानावर दाखल झाले आणि प्राथमिक तपासणीनंतर अक्षरला मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने 16वं षटक पूर्ण करण्यासाठी अभिषेक शर्माकडे चेंडू सोपवला.
अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंता वाढल्या आहेत. कारण अवघ्या काही आठवड्यांवर टी20 वर्ल्ड कप 2026 येऊन ठेपला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली असून त्यात अक्षर पटेलचा समावेश आहे. भारताच्या संतुलित संघरचनेत अक्षरची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तो फिरकीत अचूक मारा करत खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजीही करतो.
आता अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर आहे आणि तो किती लवकर फिट होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होण्यासाठी तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असून 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अशा परिस्थितीत अक्षरचा फिटनेस भारतीय संघासाठी निर्णायक ठरणार आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग.






