टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना जिंकत भारतीय संघाने इतर संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. तिरुवनंतपुरमच्या मैदानावर झालेल्या पाचव्या व निर्णायक सामन्यात भारताने 46 धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून तब्बल 271 धावांचा भव्य स्कोर उभारला. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ केला, मात्र वाढत्या रनरेटच्या दबावामुळे त्यांचे विकेट्स झपाट्याने पडले आणि कीवी संघ 19.4 षटकांत 225 धावांवर सर्वबाद झाला.
भारतीय संघाच्या फलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. तिरुवनंतपुरमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याचे स्पष्ट दिसून आले. भारताकडून ईशान किशनने शानदार खेळी करत 103 धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत अनेक आकर्षक फटके पाहायला मिळाले. भारताच्या मोठ्या धावसंख्येमुळे न्यूझीलंडवर सुरुवातीपासूनच दबाव होता. लक्ष्याचा पाठलाग करताना कीवी संघाची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकात टिम सीफर्ट 17 धावसंख्येवर बाद झाला. अर्शदीप सिंगने त्याला माघारी पाठवत भारताला पहिला यश मिळवून दिला.
यानंतर फिन अॅलन आणि रचिन रवींद्र यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 48 चेंडूंमध्ये 100 धावांची आक्रमक भागीदारी रचली. ही जोडी धोकादायक ठरत असतानाच अक्षर पटेलने नवव्या षटकात फिन अॅलनला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. फिन अॅलनने 38 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी केली. येथून पुढे भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत केली. अर्शदीप सिंगने सुरुवातीच्या षटकांत धावा दिल्या असल्या तरी नंतर जबरदस्त पुनरागमन करत अखेरच्या षटकांत विकेट्स घेतल्या. अर्शदीपने या सामन्यात पाच विकेट्स घेत टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला पाच विकेट्सचा पराक्रम केला. अक्षर पटेलने तीन, तर रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 वा विजय नोंदवला असून या बाबतीत इंग्लंडला मागे टाकले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक टी20 सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये भारत आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी भारतीय संघाची ही कामगिरी आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे.






