टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवत न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. बुधवारी तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पाचव्या व अंतिम टी20 सामन्यात भारताने 46 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेवर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या ईशान किशनच्या तुफानी शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 272 धावांचे अवघड लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात कीवी संघ 19.4 षटकांत 225 धावांवर गारद झाला.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात टिम सीफर्ट अवघ्या 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिन अॅलन आणि रचिन रवींद्र यांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी करत सामना रंगतदार केला. फिन अॅलनने 38 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी करत आठ चौकार आणि सहा षटकार ठोकले. मात्र नवव्या षटकात त्याचा विकेट पडताच न्यूझीलंडच्या डावाला उतरती कळा लागली. बेवॉन जेकब्स, काइल जेमिसनसह सहा फलंदाज दुहेरी आकड्यातही पोहोचू शकले नाहीत. कर्णधार मिचेल सँटनर शून्यावर बाद झाला, तर डॅरिल मिचेलने 26 आणि ईश सोढीने 33 धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंगने चमकदार कामगिरी करत चार षटकांत 51 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. हा त्याचा टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला पाच विकेट्सचा पराक्रम ठरला. अक्षर पटेलने तीन विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती आणि रिंकू सिंग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
याआधी भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 गडी गमावून 271 धावांचा भव्य स्कोर उभारला. संजू सॅमसन लवकर बाद झाला असला तरी ईशान किशनने त्याची उणीव भरून काढली. ईशानने 43 चेंडूंमध्ये 103 धावांची झंझावाती खेळी साकारली, ज्यात चौकारांशिवाय दहा षटकारांचा समावेश होता. हे त्याचे टी20 आंतरराष्ट्रीयतील पहिले शतक ठरले. कर्णधार सूर्यकुमार यादवने 30 चेंडूंमध्ये 63 धावा करत ईशानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी रचली. अखेरीस हार्दिक पांड्याने 17 चेंडूंमध्ये 42 धावांची आक्रमक खेळी करत भारताला टी20 इतिहासात चौथ्यांदा 250 पार पोहोचवले. टी20 विश्वचषक 2026 पूर्वी भारतीय संघासाठी हा विजय मोठा आत्मविश्वास देणारा आहे.






