भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिकेचा चौथा सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिका संघाने जिंकलो होते, तर तिसरा सामना भारताने नावावर केला होता. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यामुळे भारत या टी२० मालिकेत १-२ ने मागे आहे.
आता राजकोटमध्ये जेव्हा दोन्ही संघ आमने सामने आल्यानंतर सामना नक्कीच रोमांचक होईल. दक्षिण आफ्रिका संघ या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मालिका देखील नावावर करेल. तर दुसरीकडे भारतीय संघ सामना जिंकल्यानंतर आफ्रिकी संघाची बरोबरी करेल. या सामन्यात काही खेळाडू असतील ज्यांचे प्रदर्शन निर्णायक ठरणार आहे. आपण या लेखात अशाच ६ खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्याच्या प्रदर्शनामुळे सामनाचा निकाल बदलू शकतो.
१. इशान किशन (Ishan Kishan)
उभय संघातील या टी२० मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज इशान किशनने स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. पहिल्या तीन सामन्यांमध्ये इशानने १५७.९९ च्या स्ट्राईक रेटने आणि ५४.६७ सरासरीने १६४ धावा केल्या आहेत. अशात भारतीय संघाला चौथा सामना जिंकण्यासाठी इशान किशनने मोठी खेळी करणे गरजेचे असेल.
२. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
या मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचा दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये १२३.२९ च्या स्ट्राईक रेटने ९० धावा केल्या आहेत. अशात चौथ्या टी२० सामन्यात देखील श्रेयसकडून भारतीस संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
३. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)
मागच्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यासाठी युझवेंद्र चहलचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चहल स्वतःचा प्रभाव पाडू शकला नव्हता, पण तिसऱ्या सामन्यात मात्र त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि सामनावीर ठरला. चौथा सामना राजकोटमध्ये खेळला जाणार असून, त्याठिकाणी फिरकी गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी आहे.
४. क्विंटन डी कॉक (Quinton De Kock)
दक्षिण आफ्रिकी दिग्गज क्विंटन डी कॉक दुखापतीमुळे मालिकेतील मागच्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. चौथ्या टी२० सामन्यातून तो पुनरागमन करणार असल्याची शक्यता असून आफ्रिकी संघासाठी त्याचे प्रदर्शन महत्वाचे असणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात डी कॉकने अवघ्या २२ धावा करून विकेट गमावली होती.
५. डेविड मिलर (David Millar)
डेविड मिलरकडून देखील चौथ्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला खूप अपेक्षा असतील. आयपीएल २०२२ मध्ये डेविड मिलरने गुजरात टायटन्ससाठी अप्रतिम प्रदर्शन केले होते. सध्या सुरू असलेल्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात तो आफ्रिकी संघालासठी सर्वात्तम प्रदर्शन करणारा खेळाडू होता. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये मिलरने १७०.५९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
६. तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi)
फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या राजकोटच्या खेळपट्टीवर तबरेज शम्सी देखील त्याची जादू दाखवू शकतो. मालिकेत आतापर्यंत त्याचे प्रदर्शन काही खास राहिले नाहीये. पहिल्या तीन सामन्यांमध्ये शम्सीने फक्त एक विकेट घेतली असली, तरी चौथ्या सामन्यात मात्र तो निर्णायक ठरेल, अशी कामगिरी करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कशी नशीबानं थट्टा आज मांडली!, आयर्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी ‘या’ पाच खेळाडूंना केले दुर्लक्षित
IND vs SA: भारतासाठी ‘करो या मरो!’, महत्त्वाच्या सामन्यात कशी असू शकते दोन्ही संघाची ‘प्लेइंग ११’
सार्थ बनसोडे, सिद्धार्थ मराठे, ओमर सुमर, श्रावणी खवळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश