भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पुल फटका खेळायला खूप आवडतो. हा फटका खेळून रोहित अनेक धावा करतो. परंतु श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सध्याच्या मालिकेत हा फटका रोहितला महागात पडल्याचे दिसले आहे. याच फटक्यावर त्याने स्वतःची विकेट अनेकदा गमावली आहे. अशात भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी या फटक्याला आवर घालण्याचा सल्ला रोहितला दिला आहे.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या फटक्याविषयी विचार केला पाहिजे. त्याच्याकडे फक्त हाच फटका नाहीय, इतरही चांगले फटके आहेत. सुनील गावसकर म्हणाले की, “जो कोणी गोलंदाज थोड्या फार गतीने चेंडू टाकू शकतो, तो रोहितविरुद्ध असाच विचार करेल की, काही चौकार गेल्याने काही फरक पडणार नाही. परंतु यादरम्यान माझ्याकडे त्याची विकेट घेण्याची एक संधी असेल. कारण तो चेंडूला हवेत खेळतो. याच कारणास्तव रोहितला यावर थोडे कार्य करावे लागणार आहे.”
गावसकर पुढे बोलताना म्हणाले की, “जर त्याला वाटत असेल की, पुलचा फटका खेळून त्याला फायदा होत आहे, तर तो हा फटका खेळू शकतो. परंतु सद्यस्थितीचा विचार केला, तर हा फटका रोहितची जमेची बाजू दिसत नाहीये. अशात मला वाटते की, रोहितने हा फटका खेळायचे बंद करायला हवे.”
दरम्यान, भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला गेला. हा सामना भारतीय संघाने एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पहिल्या डावात २८ धावा करून बाद झाला. श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरू कुमारने टाकलेल्या चेंडूवर रोहितने पुल फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि सुरंगा लकमलच्या हाती झेलबाद झाला. रोहित या चेंडूला व्यवस्थित टाइम करू शकला नाही आणि झेल देऊन बसला.
दरम्यान, भारत आणि श्रीलंकेती दुसरा कसोटी सामना १४ मार्चपासून बेंगलोरमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरुपाचा असेल, जो गुलाबी चेंडूने खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
अखेर दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नचे पार्थिव मेलबर्नमध्ये दाखल, मार्चअंती होणार अनंतात विलिन
“फिटनेसच्या जोरावर विराट सचिनचे सर्व विक्रम मोडेल” दिग्गजाने व्यक्त केला विश्वास