चालू टी20 विश्वचषकात खूप मोठ-मोठे अपसेट पाहायला मिळाले आहेत. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात यजमान अमेरिकेने धक्का दिला. दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरण्यासाठी दुसऱ्या संघांवर अवलंबून आहे.
आज (12 जून) भारत आणि अमेरिका यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करेल. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयाचा पाकिस्तानला फायदा होईल. पण असे का? चला तर मग जाणून घेऊया
टी20 विश्वचषकाच्या ‘अ’ गटामध्ये भारत, पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड आणि अमेरिका संघाचा समावेश आहे. भारत सलग दोन सामन्यात विजय मिळवून 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर अमेरिकाही 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र त्यांचा नेट रनरेट भारतापेक्षा कमी आहे. तर पाकिस्ताननं 3 सामन्यात केवळ एक सामना जिंकला आहे. जर आजचा भारत विरुद्ध अमेरिका सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघाना 1-1 गुण दिला जाईल. यासह दोन्ही संघ 5 गुणांसह सुपर-8 साठी पात्र ठरतील. जरी पाकिस्ताननं त्यांचा उर्वरित एक सामना जिंकला, तरी त्यांचे 4 गुण होतील, जे की सुपर -8 साठी पात्र ठरण्यासाठी पुरेसे नाही.
आजच्या भारत-अमेरिका सामन्यात जो संघ विजयी ठरेल, तो संघ सुपर-8 साठी पात्र ठरेल. याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सुपर-8 मध्ये पात्र झाले आहेत. या सामन्यानंतरही भारत आणि अमेरिकेचा एक-एक सामना शिल्लक आहे. साखळी फेरीत पाकिस्तानचा 16 जून रोजी आयर्लंड विरुद्ध शेवटचा सामना असेल. तर अमेरिकेचा सामना 14 जून रोजी आयर्लंड विरुद्ध होईल. मात्र या सामन्यावर पावसाचे संकट वर्तवले जात आहे. त्यामुळे जरी आज अमेरिकेचा भारताकडून पराभव झाला आणि आयर्लंड विरुद्धचा सामना रद्द झाला, तरी अमेरिका सुपर-8 साठी पात्र ठरेल. त्यामुळे पाकिस्तानच्या सुपर-8 च्या आशा डळमळीत आहेत, असंच दिसतंय.
महत्तवाच्या बातम्या-
पावसामुळे नेपाळ-श्रीलंकेची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये दाखल
भारत-पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजांची चांदी! कॅनेडियन रॅपरनं जिंकले कोट्यवधी रुपये
ऑस्ट्रेलियाची सुपर 8 मध्ये धडक! ट्रॅव्हिस हेडचा आयपीएलमधील फॉर्म जारी, पॉवरप्लेमध्ये रचला इतिहास