भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज (१४ जुलै ) रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय महिला संघाकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
भारतीय महिला संघाला या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाने जोरदार पुनरागमन करत इंग्लंड संघाला पराभूत केले होते. त्यामुळे ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे ही मालिका जिंकण्याची समान संधी असणार आहे.
तसेच तिसरा सामना जिंकून भारतीय महिला संघाकडे २०१९ नंतर पहिल्यांदाच टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची संधी आहे. २०१९ मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध शेवटची टी -२० मालिका जिंकली होती. तसेच इंग्लंडमध्ये २००६ सालानंतर पहिल्यांदाच द्विपक्षीय टी२० मालिका जिंकण्याची संधी भारतीय महिला संघाला असणार आहे.
दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंड संघ मजबूत स्थितीत असताना देखील भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड संघाकडून हा सामना खेचून घेतला होता. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाने तीनही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. इंग्लंड संघ धावांचा पाठलाग करत असताना भारतीय क्षेत्ररक्षकांनी इंग्लंडच्या ४ फलंदाजांना धावबाद करत माघारी धाडले होते.
मध्यक्रमातील फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
भारतीय संघाच्या विजयात शेफाली वर्मा आणि फिरकी गोलंदाजांनी देखील महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु अंतिम सामन्यात विजय मिळवायचा असेल तर, मध्यक्रमातील फलंदाजांनी योगदान देणे गरजेचे असणार आहे. हरमनप्रीत गेल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आली होती. यादरम्यान तिने ३१ धावांची खेळी केली होती. (Ind W vs Eng W: Indian women’s Cricket team just one game away to create history)
भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने दुसऱ्या टी -२० सामन्यात तुफानी सुरुवात करून देत ४८ धावांची खेळी केली होती. यामध्ये तिने ८ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तरीदेखील भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. या सामन्यात देखील शेफाली वर्मा महत्वाची भूमिका बजावू शकते. परंतु मोठी धावसंख्या उभारायची असेल तर, संघातील इतर फलंदाजांनी देखील योगदान देणे तितकेच महत्वाचे असणार आहे.
तसेच, दुसऱ्या सामन्याप्रमाणे गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना उत्तम प्रदर्शन करावे लागणार आहे.
असे आहेत संघ –
भारत – हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्म्रीती मंधाना, दीप्ति शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, ऋचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्त, राधा यादव, सिमरन दिल बहादुर.
इंग्लंड – हीदर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमॉन्ट, कॅथरीन ब्रंट, फ्रेया डेविस, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, टॅश फरान्ट, सारा ग्लेन, एमी जोन्स, नेट सिवर, अन्या श्रबसोल, मॅडी विलियर्स, फ्रॅन विल्सन, डॅनीएल वॅट.
महत्त्वाच्या बातम्या –
यशपाल शर्मा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला होता घाम, पाहा त्यांनी मारलेला गगनचुंबी षटकार