आज (15 ऑगस्ट 2023) भारत देशाचा 76 वा वर्धापन दिन. स्वातंत्र्य महोत्सवाचे औचित्य साधून भारतवासी त्यांचे देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसआधी (14 ऑगस्ट) पाकिस्तान देशाचाही स्वातंत्र्य दिवस पार पडला. भारत आणि पाकिस्तान हे देश एकमेकांचे शेजारी आहेत. परंतु अनेक कारणास्तव दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहिलेले नाहीत. अगदी क्रिडा क्षेत्रातही भारत-पाकिस्तान शत्रूत्वाचे पडसाद उमटले आहेत. दोन्ही देशांचे क्रिकेटपटू आमने सामने आले म्हणजे घमासान पाहायला मिळते.
परंतु तुम्हाला माहितीय का, एक असे भारतीय क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, ज्यांनी चक्क पाकिस्तानी पंतप्रधानांच्या नात्यातील मुलीसोबत संसार थाटला होता. त्याच क्रिकेटपटूची कहाणी आपण जाणून घेऊ…
इंग्रजांनी भारतात ज्या वेळी क्रिकेट आणले त्यावेळी श्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळात फक्त राजेरजवाडे भाग घेत. कालांतराने सैन्य क्रिकेट खेळू लागले आणि पाहता पाहता संपूर्ण भारताला या खेळाने वेड लावले. तेव्हाचे बॉम्बे म्हणजेच आत्ताची मुंबई या खेळाचे भारतातील माहेरघर बनत गेले. मुंबईने भारताला आणि जगाला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू दिले. त्याच ‘बॉम्बे स्कूल क्रिकेट’चे एक क्रिकेटपटू, जे विलक्षण फलंदाज होते. परंतु, त्यांची कारकीर्द खूपच लहान राहिली आणि भारत-पाकिस्तान फाळणीमुळे ते जास्त क्रिकेट खेळू शकले नाहीत. त्यांनी भारताकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र, नंतर ते क्रिकेट सोडून पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले आणि पुन्हा कधीही क्रिकेट खेळले नाहीत. ‘केसी इब्राहिम’ असे या खेळाडूचे नाव आहे.
त्यांचा जन्म 26 जानेवारी 1919 रोजी बॉम्बे म्हणजेच आजच्या मुंबईत झाला. खानमोहम्मद कुसुमभॉय इब्राहिम असे त्यांचे पूर्ण नाव होते. 1948-1949 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी भारतासाठी चार कसोटी सामने खेळले होते. 2007 मध्ये कराची येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या वेळी ते भारताकडून खेळलेले सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते.
पदार्पणाच्या सामन्यात केली होती चमकदार कामगिरी
इब्राहिम यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्यांना विनू मंकड यांच्यासह सलामीची जबाबदारी मिळाली. दिल्ली येथे झालेल्या या कसोटी सामन्यात त्यांनी 85 आणि 44 धावांच्या जबरदस्त खेळ्या खेळल्या. पण पुढच्या तीन कसोटी सामन्यात त्यांची बॅट शांत राहिली. पुढच्या सहा डावांमध्ये मिळून त्यांना केवळ 40 धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर काही काळ भारताचा एकही दौरा झाला नाही.
पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या नात्यातील मुलीशी बांधली लग्नगाठ
अखेर 1951-1952 मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला; तत्पुर्वीच इब्राहिम यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी म्हणजे 1950मध्ये क्रिकेट सोडले होते. त्यानंतर ते पाकिस्तानात गेले. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान राहिलेल्या बेस्ट मोहम्मद अली जिना यांचा नात्यातील एका मुलीशी विवाह करून त्यांनी पाकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अखेरपर्यंत ते पाकिस्तानातच राहिले. ते पाकिस्तानात स्थायिक झाले होते आणि तेथेच व्यवसायात त्यांनी आपले बस्तान बसवले होते.
केल्या होत्या बिनबाद 709धावा
इब्राहिम हे वरच्या फळीत फलंदाजी करत. 1938-1939च्या हंगामात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. मात्र, सुरुवातीची दोन वर्षे त्यांना काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यानंतर 1941-1942च्या हंगामापासून त्यांनी धावांचा रतीब घालण्यास सुरुवात केली. त्यांना लवकरच मुंबईच्या वरिष्ठ संघात नियमित स्थान मिळाले आणि त्यांनी 230 धावांची नाबाद खेळी साकारली. त्यानंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईकडून 117धावा केल्या.
1947-1948पर्यंत इब्राहिम यांचे नशीब जोरावर होते. या हंगामात त्यांनी 167.29 च्या अविश्वसनीय सरासरीने 1171 धावा केल्या. यात चार शतकांचा समावेश होता. या हंगामात त्यांनी बाद न होता 709धावा केल्या होत्या. या कालावधीत त्यांच्या धावसंख्या 218 नाबाद, 36 नाबाद, 23 नाबाद, 77 आणि नाबाद 114 अश्या होत्या. या कामगिरीमुळे ते वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटर म्हणून निवडले गेले होते.
वयाच्या ३१ व्या वर्षी सोडले क्रिकेट
केसी इब्राहिम हे सलग दोन सामन्यात सलामीवीर म्हणून दुहेरी शतक ठोकणारे व अखेरपर्यंत नाबाद राहणारे एकमेव क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या नेतृत्वात बॉम्बेने 1948 मध्ये रणजी करंडक जिंकला. या अंतिम सामन्यात त्यांनी 219 धावा केल्या होत्या. त्यांनी खेळलेल्या चार आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये 21.12 च्या सरासरीने 169 धावा केल्या. परंतु, 60 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांची सरासरी ६१.२४ अशी होती. त्यांच्या नावे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 4716 धावा आहेत. ज्यामध्ये 14 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे
महत्वाच्या बातम्या –
Independence Day Special| दुर्दैवच भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशीच यशस्वी कर्णधाराने घेतलेला जगाचा निरोप
स्वदेश असो वा परदेश, देशप्रेम महत्त्वाचं! जेव्हा टीम इंडियाने सातासमुद्रापार फडकावलेला तिरंगा