भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा 4 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. या दौऱ्यापूर्वी इंडिया ए संघ बांगलादेश दौऱ्यावर असून, इंडिया ए आणि बांगलादेश ए या संघांंदरम्यान पहिली अनधिकृत कसोटी कोक्स बाजार येथे सुरू झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारतीय संघाने वर्चस्व गाजवत आघाडी घेतली आहे.
उभय संघांच्या मालिकेआधी या अनधिकृत कसोटीचे आयोजन केले गेले. इंडिया ए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मध्यमगती गोलंदाज मुकेश कुमार व वेगवान गोलंदाज नवदीप सैनी या दोघांनी बांगलादेशच्या फलंदाजांना डोके वर न काढू देता अवघ्या 26 धावांमध्ये त्यांचा निम्मा संघ तंबूत पाठवला. बांगलादेश संघाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी मोसद्देक होसेन याने घेतली. त्याने 88 चेंडूवर 63 धावा काढल्या. त्यानंतर डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार याने बांगलादेशचे शेपूट गुंडाळण्याचे काम केले. त्याने चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत बांगलादेश ए संघाचा डाव 112 धावांवर संपवला. भारतासाठी सौरभने 4, सैनीने 3 व मुकेशने 2 बळी मिळवले.
गोलंदाजांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीवर इंडिया ए संघाच्या सलामीवीरांनी साज चढवला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन व यशस्वी जयस्वाल यांनी संपूर्ण दिवसभर फलंदाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दोघांनी 120 धावांची नाबाद भागीदारी केली. दिवसाखेर यशस्वी 63 तर अभिमन्यू 53 धावांवर नाबाद होते.
वरिष्ठ भारतीय संघ 4 डिसेंबरपासून बांगलादेशच्या संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. तर, त्यानंतर उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
(India a in strong position Against Bangladesh a)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत 41 वर्षांपूर्वीचा ‘हा’ नकोसा विक्रम पुन्हा करणार? गावसकरांपैक्षा धवनकडून जास्त अपेक्षा!
‘या’ गोलंदाजासोबत खेळण्याचा मला फायदाच, अर्शदीप सिंगने सांगितले चकित करणारे नाव