टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले होते. त्यानंतर नुकताच संपन्न झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. भारतीय खेळाडूंनी सर्व विक्रम मोडत टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत मोठा विक्रम केला आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण १९ पदकांची कमाई केली आहे.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला एकूण ५ सुवर्णपदक, ८ रौप्यपदक आणि ६ कांस्यपदक जिंकण्यात यश आले आहे. १९ पदकं मिळवून भारताने या यादीत २४ वे स्थान मिळवले. पॅरालिंपिक स्पर्धेतील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हे खेळाडू ठरले सुवर्ण पदकाचे मानकरी
भारतासाठी सर्वात पहिले सुवर्णपदक अवनी लेखराने मिळवून दिले होते. हे पदक तिने महिलांच्या १० मीटर एयर रायफल शूटिंगमध्ये मिळवले होते. यानंतर सुमित अंटीलने पॅरा भालाफेक क्रिडा प्रकारात भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले होते.
त्यानंतर मनीष नरवालने ५० मीटर शूटिंग इव्हेंटमध्ये भारताला तिसरे तर, प्रमोद भगतने भारताला पॅरा बॅडमिंटनमध्ये चौथे सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी (५ सप्टेंबर) पॅरा बॅडमिंटनमध्येच कृष्णा नागरने अप्रतिम कामगिरी करत भारताला ५ वे सुवर्णपदक मिळवून दिले.
या खेळाडूंनी जिंकून दिले रौप्यपदक
रौप्यपदकबद्दल बोलायचं झालं, तर भारताला ५ रौप्यपदक ॲथलेटीक्समध्ये मिळाले. यासह भारताला टेबल टेनिस आणि शूटींग इव्हेंटमध्ये प्रत्येकी १ रौप्यपदक मिळाले. यासह स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुहास यथीराजने बॅडमिंटन या खेळात भारताला ८ वे रौप्यपदक जिंकून दिले आहे.
भारताला टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल, उंच उडीमध्ये निषाद कुमारने, तर योगेश कथूनियाने थाळीफेकमध्ये रौप्यपदक मिळवून दिले होते. तसेच देवेंद्र झाझरियाने भालाफेक, मरीयप्पण थंगावेलू आणि प्रवीण कुमारने उंच उडीमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. ५० मीटर एयर पिस्टल शूटींगमध्ये सिंगराज अडानाने भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते.(India creates history in Tokyo ends campaign with 19 medals)
या खेळाडूंनी जिंकून दिले कांस्यपदक
कांस्य पदकाबद्दल बोलायचं झालं तर, भारताने या स्पर्धेत ६ पदकांची कमाई केली. भारतासाठी सुंदर सिंग गुर्जरने भालाफेक, सिंगराज अडानाने शूटींगमध्ये, शरद कुमारने उंच उडी, अवनी लेखराने शूटिंग, हरविंदर सिंगने तीरंदाजी आणि मनोज सरकारने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक मिळवले. अवनी लेखरा आणि सिंगराज अडाना यांनी पॅरालंपिक प्रत्येकी २ पदकं मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! बॅटमिंटनमध्ये कृष्णा नागरची ‘सोनेरी’ कामगिरी, भारताच्या नावावर ५ वे सुवर्णपदक
शिक्षकदिन! आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास