कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यान तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. श्रीलंकेने या सामन्यात तीन गडी गमावून भारतीय संघाने दिलेले ८२ धावांचे आव्हान पंधराव्या षटकात पूर्ण करून २-१ ने मालिका विजय मिळवला. यासह भारतीय संघाला आपल्या टी२० इतिहासातील एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
भारतीय संघाचा मोठा पराभव
फलंदाजांनी कचखाऊ कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ निर्धारित २० षटकात केवळ ८१ धावा बनवू शकला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेने १४.३ षटकात तीन गडी गमावून हे आव्हान पार केले. कोणत्याही संघाने भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला हा दुसरा मोठा पराभव आहे. श्रीलंकेने ३३ चेंडू राखून हा विजय मिळवला.
भारताचा सर्वाधिक चेंडू राखून सर्वात मोठा पराभव करण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे जातो. ऑस्ट्रेलियाने २००८ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघावर तब्बल ५२ चेंडू राखून विजय संपादन केलेला. विशेष म्हणजे या यादीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर देखील ऑस्ट्रेलियाच आहे. २०१२ टी२० विश्वचषक यावेळी त्यांनी याच कोलंबोच्या मैदानावर भारताला ३२ चेंडू राखून आणि २०१७ भारत दौऱ्यावर गुवाहाटी टी२० मध्ये २७ चेंडू राखून विजय मिळविलेला.
श्रीलंकेचा शानदार मालिका विजय
वनडे मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर श्रीलंकेने टी२० मालिकेत दमदार कामगिरी केली. त्यांना पहिल्या सामन्यात ३८ धावांनी पराभव पाहावा लागला होता. मात्र, त्यानंतर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघावर त्यांनी सलग दोन सामन्यात विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकाआधी हा विजय सततचे पराभव पाहणाऱ्या श्रीलंका संघासाठी नवसंजीवनी ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
हसरंगाची वाढदिवशी स्वतःलाच अनोखी भेट, भारतीय संघाचे कंबरडे मोडत रचला नवा विक्रम
श्रीलंकेचा ‘फ्लाईंग’ कर्णधार! तिसऱ्या सामन्यात टिपले दोन अफलातून झेल, पाहा व्हिडिओ