क्राईस्टचर्च। कालपासून(29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(1 मार्च) दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 90 धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या 7 धावांच्या आघाडीमुळे सध्या भारत 97 धावांनी पुढे आहे. मात्र आज भारताचे दुसऱ्या डावात सर्व प्रमुख फलंदाज तंबूत परतले आहेत.
भारताचे पृथ्वी शॉ(14) आणि मयंर अगरवाल(3) ही सलामीवीरांची जोडी दुसऱ्या डावाच्या पहिल्या 10 षटकातच बाद होऊन तंबूत परतली. तर भारताचा कर्णधार विराट कोहली या डावातही मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला. त्याला 14 धावांवर कॉलिन डी ग्रँडहोमने पायचीत केले.
त्याच्यापाठोपाठ अजिंक्य रहाणे(9), चेतेश्वर पुजारा(24) आणि उमेश यादव(1) यांनीही विकेट्स गमावल्या. सध्या रिषभ पंत(1) आणि हनुमा विहारी(5) नाबाद खेळत आहेत.
दुसऱ्या दिवसाखेर पर्यंत या डावात न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर टीम साऊथी, कॉलिन डी ग्रँडहोम आणि नील वॅगनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
तत्पूर्वी आज न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करायला लावला.
न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेल यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र ब्लेंडेल आज 30 धावांवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याच्यापाठोपाठ केन विलियम्सन(3), रॉस टेलर(15), हेन्री निकोल्स(14), बीजे वॉटलिंग(0) हे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण यावेळी लॅथमने अर्धशतकी खेळी करताना 52 धावा केल्या. पण तोही अर्धशतक केल्यानंतर लगेचच बाद झाला.
असे असले तरी न्यूझीलंडच्या तळातल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा चांगली लढत दिली. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने नील वॅगनरबरोबर(21) 8 व्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. जेमिसनने 49 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 235 धावसंख्या गाठण्यात यश आले.
या डावात भारताकडून गोलंदाजी करताना शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. तसेच जडेजाने 2 विकेट्स आणि उमेश यादवने 1 विकेट घेतली.
त्याआधी भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला आहे.
https://twitter.com/Maha_Sports/status/1233994042674946048
या स्टेडियमवर होणार महिला आयपीएलचे सामने; नवीन संघाचीही झाली घोषणा
वाचा👉https://t.co/E89JPPpVR6👈#म #मराठी #Cricket #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020