भारत आणि पाकिस्तान, या कट्टर प्रतिद्वंद्वी संघांना चाहते पुन्हा एकदा आमने सामने पाहू शकतात. फरक फक्त एवढाच आहे की, टी-२० विश्वचषकात हे पुरुष संघ एकमेकांसोबत भिडले होते आणि आता महिला संघ एकमेकांशी भिडणार आहेत. २०२२ मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचाही समावेश केला गेला आहे आणि शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) या स्पर्धेदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले गेले आहे. आता पुढच्या वर्षी बर्मिंघममध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सनमध्ये भारत आणि पाकिस्तान महिला संघात संघर्ष पाहायला मिळणार आहे.
शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीने या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघ त्यांचा पहिल सामना २९ जुलैला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान महिला संघ ३१ जुलैला भिडणार आहे. सगळे सामने बर्मिंघमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये असल्यामुळे चाहत्यांना हा सामना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ऑगस्ट महिन्यात खेळला जाईल. दरम्यान, १९९८ नंतर पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटला सामील केले गेले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की, महिला क्रिकेट टूर्नामेंट २९ जुलैपासून एजबेस्टनमध्ये आयोजित केले जाईल. कांस्य पदक आणि सुवर्ण पदकासाठीचे सामने ७ ऑगस्टला खेळले जातील. तसेच उपांत्य सामने ६ ऑगस्टला खेळले जातील. इंग्लंडचा पहिला सामना ३० जुलैला क्वालिफायरमधून खेळणार आहे. क्वालिफायर सामने २०२२ च्या सुरुवातीला खेळले जातील. इंग्लंड संघ त्यानंतर २ ऑगस्टला दक्षिण अफ्रिका आणि ४ ऑगस्टला न्यूझीलंडविरुद्ध सामने खेळेल.
या स्पर्धेत एकूण ८ संघ खेळतील, ज्यांची चार-चारच्या ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारत ग्रुप ए मध्ये आहे. याच ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बारबाडोस हे संघ आहेत. ग्रुप बी मध्ये इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि एक क्वालिफायर संघ असणार आहे, जो २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये निश्चित होईल. या दोन्ही ग्रुपमधून प्रत्येकी दोन संघ उपांत्य सामना खेळण्यासाठी पात्र ठरतील. भारतीय संघाचा स्पर्धेतील शेवटचा ग्रुप स्टेज सामना ३ ऑगस्टला असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकानंतर पुन्हा भिडणार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ, ‘या’ दिग्गजांना मिळू शकते विश्रांती
‘टी२० विश्वचषकाच्या संघ निवडीत माझा आणि विराटचा सहभाग नव्हताच’, शास्त्रींचा धक्कादायक खुलासा
टी२० विश्वचषक फायनलसाठी पंचांची नावे निश्चित, भारतातूनही आहे एक नाव; पाहा संपूर्ण यादी